विक्रमी दूध देणाऱ्या म्हशीची एवढ्या लाखांना झाली विक्री

हरियाणाच्या मुर्राह जातीच्या जागतिक विक्रम बनवणाऱ्या सरस्वती म्हशीची तब्बल 51 लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे. हिसार जिल्ह्यातील लितानी येथील शेतकरी सुखबीरसिंग ढांडा यांच्याकडे या म्हशीची मालकी होती. सरस्वती म्हशीने 33.131 किलोग्रॅम दूध देऊन पाकिस्तानी म्हशीचा विक्रम मोडला होता. या म्हशीला आता लुधियानाच्या पवित्र सिंह नावाच्या व्यक्तीने खरेदी केले. सुखबीर सिंह यांना या म्हशीच्या चोरीची भिती होती.

काही दिवसांपुर्वी सुखबीर सरस्वतीला घेऊन लुधियानातील जगरांव येथे डेअरी अँड एग्री एक्स्पोमध्ये भाग घेण्यास गेले होते. तेथे सरस्वतीने 33.131 दूध देऊन विश्वविक्रम केला होता. यासाठी त्यांना 2 लाख रुपये बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले होते.

याआधी सर्वाधिक दुध देण्याचा विक्रम पाकिस्तानच्या म्हशीच्या नावावर होता. या म्हशीने 32.050 किलोग्रॅम दूध दिले होते.

म्हशीला विकण्याआधी सुखबीर यांनी कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. यात जवळपास 700 शेतकरी सहभागी झाले होते. या म्हशीला सुखबीर यांनी 1 लाख 30 हजार रुपयांमध्ये 4 वर्षांपुर्वी खरेदी केले होते.

Leave a Comment