इराणच्या उपआरोग्य मंत्र्यांना करोनाची लागण


फोटो सौजन्य गार्डियन
चीनमधून जगभर संचार करत असलेल्या करोना विषाणूने गरीब, श्रीमंत, उच्च नीच, प्रतिष्ठित आणि गुन्हेगार असा कोणताही भेदभाव केलेला नसल्याचे दिसून येत आहे. इराणचे उप आरोग्य मंत्री इराज हरीची यांना करोनाची लागण झाली असल्याचे मंत्रालय अधिकाऱ्यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.

मिडिया सल्लागार अलीरजा वहाबजादेह त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. त्यानुसार हरीची यांची करोना टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरीची यांना सतत खोकला येत होता आणि सोमवारी सरकारी प्रवक्ते अली रबी सह ते पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांना खूप घाम येऊ लागला तेव्हा त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांची करोना टेस्ट केली गेली. विशेष म्हणजे या पत्रकार वार्तालापात एका खासदाराने इराणचे शिया तीर्थशहर केम येथे करोनामुळे ५० मृत्य झाल्याचा केलेला दावा हरीची यांनी फेटाळून लावला होता.

इराण मध्ये मंगळवार पर्यंत करोना मुळे मृत्यू पडलेल्या लोकांची संख्या सरकारी आकड्यानुसार तीन आहे आणि ३४ लोकांना लागण झाल्याचे म्हटले गेले आहे. मात्र हा प्रकार धर्माशी जोडलेला असल्याने केम मशीद बंद केली जात नसल्याचे आणि त्यामुळे या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे आरोप सरकारवर केले जात आहेत. इराण मध्ये वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत, तेथे डॉक्टर आणि रुग्णालयांची संख्याही कमी आहे. त्यात मास्कचा तुडवडा निर्माण झाला असल्याचे समजते.

Leave a Comment