अणुयुद्धामध्ये नष्ट होणार नाही असे जगातील सर्वात बळकट घर पोलंडमध्ये


आपले राहते घर सर्व प्रकारे सुरक्षित असावे, असे कोणाला वाटत नाही? म्हणूनच घर खरेदी करताना किंवा नव्याने बनवविताना आपण आपले घर हर प्रकारे सुरक्षित असेल याची खात्री करून घेत असतो. असेच एक घर सर्व जगामध्ये सर्वाधिक सुरक्षित मानले जात आहे. हे घर इतके बळकट आणि सुरक्षित आहे, की अणुस्फोट झाला, तरी त्यापासून या घराला कोणताही धोका उद्भवणार नाही, इतके हे घर मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. पोलंड देशाची राजधानी वॉरसॉ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने असे घर बनविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पोलंडमधील प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी केडब्ल्यूके प्रोम्स यांनी या व्यक्तीची इच्छा प्रत्यक्षात उतरवत जगातील सर्वाधिक बळकट आणि सुरक्षित घर उभे केले. या घराची उभारणी हे या आर्किटेक्चर कंपनीसाठी मोठे आव्हानच होते. हे आव्हान स्वीकारत त्यांच्या क्लायंटच्या सर्व गरजा लक्षात घेऊन त्याच्या अपेक्षा सार्थ ठरवत हे घर उभे राहिले आहे.

या घराच्या आसपास कॉन्क्रीटच्या बळकट भिंती असून, केवळ एक बटन दाबल्याने या भिंती घराच्या आसपास संरक्षक कवचाप्रमाणे काम करतात. या भिंतींमुळे हे घर एखाद्या बालेकिल्ल्याप्रमाणे दिसू लागते. एकदा या संरक्षक भिंती घराच्या आसपास उभ्या राहिल्या, ही या घरामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. अश्या वेळी या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचा वापर करता येऊ शकतो. पण हा पूल देखील घराच्या आतून विशिष्ट बटन दाबल्यानंतरच वापरता येऊ शकतो. बाहेरून एखाद्या बालेकिल्ल्याप्रमाणे दिसणारे हे घर आतमधून मात्र अतिशय सुंदर सजविले गेले आहे. या घरामध्ये एक स्विमिंग पूलही तयार करण्यात आला आहे.

कॉन्क्रीटच्या बळकट भितींच्या शिवाय स्टीलचा वापर करून बनविण्यात आलेली शटर्स देखील या घराला अधिक सुरक्षित बनवितात. एकदा हे घर भिंतींनी आणि शटर्सनी पूर्ण बंद झाले, की अणुस्फोटाने देखील या घराचे कोणतेच नुकसान होऊ शकणार नसल्याचा आर्किटेक्चर कंपनीने दावा केला आहे.

Leave a Comment