जोडीदाराशी संबंध तोडण्याची अशीही अजब कारणे

breakup
एक काळ असा होता जेव्हा आपल्या जोडीदाराशी संबंध तोडून टाकण्याचा विचार करणे देखील लोकांना अवघड वाटत असे. स्वतःची इभ्रत आणि लोकलज्जा या गोष्टींपायी नात्यामध्ये कितीही कटुता, असामंजस्य असले, तरी जोडीदाराशी नाते शेवटपर्यंत टिकून ठेवण्याचे प्रयत्न केले जात असत. पण आता काळ बदलला तशी मते, विचारधाराही बदलली, व्यक्तीस्वातंत्र्य आले. स्त्रिया आणि पुरुष हे दोघेही स्वाभिमानी आणि स्वावलंबी झाल्याने मतभेद झालेच तर माघार न घेता, किंवा आपले जुळणे शक्य नाही हे लक्षात येताच वेगळे होऊन आपापल्या मार्गाने जाण्याची प्रथा रूढ होताना दिसू लागली. अशा प्रकारचे मतभेद असताना नातेसंबंध तोडून टाकून नव्या आयुष्याला सुरुवात करणे योग्य असले, तरी अनेकदा अतिशय क्षुल्लक कारणांवरून नातेसंबंध तुटतानाही पहावयास मिळू लागले. पाश्चात्य देशांमध्ये हे प्रमाण खूपच वाढले. असेच काही प्रसंग काही मंडळींनी सोशल मिडियावर नुकतेच शेअर केले आहेत.
breakup1
रिलेशनशिपबद्दलचे हे किस्से खूपच रोचक आहेत. एका तेवीस वर्षीय तरुणीने आपल्या जोडीदाराशी ‘ब्रेक अप’ झाल्याचे कारण सोशल मिडियावर शेअर केले आहे. या तरुणीला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका अतिशय आवडत असून, या मालिकेचा प्रत्येक भाग तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पाहण्याची इच्छा असे. पण तिचा बॉयफ्रेंड प्रत्येक भागाची कथा तिला आधीच सांगून टाकत असल्याने ही मालिका पाहण्याच्या उत्सुकतेवर पाणी पडत असे. अखेरीस आपल्या बॉयफ्रेंडच्या या सवयीला कंटाळून जाऊन या तरुणीने त्याच्याशी असलेले आपले नाते तोडून टाकल्याचे म्हटले आहे. मालिकेबद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या उत्सुकतेवर नेहमीच पाणी पडत असल्याने आपण हे नातेसंबंध तोडून टाकल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे.
breakup2
आणखी एका तरुणीने सोशल मिडियावर आपल्या ‘ब्रेकअप’ चा किस्सा सांगितला आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड एकत्र सुट्टीसाठी गेले असताना तिचे फोटो घेण्याऐवजी तिचा बॉयफ्रेंड आसपासच्या सुंदर निसर्गाची छायाचित्रे टिपू लागला. यामुळे रागावून तिने आपल्या बॉयफ्रेंड बरोबरचे आपले नाते संपवून टाकल्याचे म्हटले आहे. तर एका तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या सोबत ‘टेक अवे’ डिनर, खात असताना त्याच्या मैत्रिणीने वापरलेले टिश्यू पेपर त्याच्या कारच्या खिडकीतून बाहेर फेकल्याने तिच्याशी असलेले संबंध कायमचे संपविल्याबद्दल लिहिले आहे. एकाने आपल्या मैत्रिणीची नखे खूपच लांब असल्याने तिच्यासोबत आपण ‘ब्रेकअप’ केल्याचे म्हटले आहे, तर आणखी एका तरुणाने आपली मैत्रीण काहीही खात असताना भयंकर आवाज करीत असल्याच्या कारणावरून संबंध कायमचे संपविल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment