या जगामध्ये असेही होऊन गेले महाठग

con-men
इंग्रजी ‘कॉन मॅन’ हा शब्द खरे तर मूळचा ‘कॉन्फिडन्स मॅन’ असा आहे. इतरांचा विश्वास संपादन करून नंतर त्यांना गंडविणाऱ्या इसमाला उद्देशून हा शब्द वापरला जात असे. कालांतराने या शब्दाने आपले मूळ रूप बदलले आणि आजच्या काळामध्ये हाच शब्द ‘कॉन मॅन’, म्हणजेच ठग, म्हणून प्रचलित झाला. जगामध्ये आजवर अनेक ठग होऊन गेले आहेत. आपल्या बुद्धीच्या आणि संभाषणचातुर्याच्या जोरावर या लोकांनी इतरांना इतके बेमालूमपणे गंडविले, की आपली फसवणूक होते आहे हे लोकांच्या लक्षातच येत नसे. जगामध्ये असेच काही महाठग होऊन गेले ज्यांनी लोकांना फसवून लाखो डॉलर्स लुटले.
con-men1
व्हिक्टर लूस्टीग हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात चलाख ठग म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला लहान मोठे जादूचे प्रयोग करीत उदरनिर्वाह करीत असलेल्या व्हिक्टरला लोकांना फसविण्याची अफाट कल्पना सुचली आणि त्याने ती लगेच अंमलातही आणली. व्हिक्टरचे वागणेबोलणे इतके लाघवी होते, की समोरच्याचा विश्वास त्याच्यावर सहज बसत असे. या पठ्ठ्याने पॅरीसच्या आयफेल टॉवरच्या खोट्या विक्रीचा व्यवहार चक्क एकदा नाही तर दोनदा पार पाडला. आपण फ्रांस सरकारचे बडे सरकारी अधिकारी असल्याचे भासवत आयफेल टॉवरच्या विक्रीची जबाबदारी आपल्यावर असल्याचे भासवीत हे व्यवहार त्याने पार पाडले. आयफेल टॉवरमध्ये अनेक अभियांत्रिकी दोष आहेत, याच्याशी निगडीत अनेक गुप्त राजकीय वाद आहेत अशी कारणे सांगत व्हिक्टरने आयफेल टॉवरची विक्री केली. या व्यवहारांच्या मार्फत व्हिक्टरने कोट्यवधी डॉलर्सची कमाई केली. इतक्यावरच व्हिक्टर थांबला नाही, तर ज्यांना लोकांना ठगण्याच्या व्यवसायामध्ये यायचे असेल, त्यांच्यासाठी काही महत्वाचे नियमही या महाभागाने लिहून ठेवले होते.
con-men2
अमेरिकेतील ग्रेगर मॅकग्रेगर या इसमाने आपण मध्य अमेरीतेतील एका लहानश्या ‘पोयैस’ नामक राज्याचे राजपुत्र असल्याचे भासवून, लोकांना फसवून तब्बल २००,००० युरोजची कमाई केली होती. होन्डुरास येथे असलेले त्याचे ‘पोयैस’ राज्य अर्थातच काल्पनिक होते. या राज्यामध्ये सोन्याच्या अनेक खाणी असून, येथील जमिनी अतिशय सुपीक असल्याचे त्याने लोकांना सांगून याच खाणींचे आणि जमिनींचे खोटे व्यवहार करीत हजारो युरोजची कमाई केली. त्या काळी स्कॉटलंड आणि मध्य तसेच दक्षिण अमेरीकेतील अनेक व्यावसायिक पैसा गुंतविण्यासाठी चांगल्या मोक्याच्या शोधात होतेच, याच व्यावसायिकांना ग्रेगरने आपल्या गोत्यात घेऊन अनेक काल्पनिक सुपीक जमिनी या व्यावसायिकांना विकल्या होत्या.
con-men3
एदुआर्दो द व्हॅलफियेर्नो याने १९११ साली पॅरीस येथील सुप्रसिद्ध लूव्र संग्रहालयामध्ये असलेले ‘मोना लिसा’चे पेंटिंगची चोरी करण्यासाठी लूव्र येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला राजी केले आणि पेंटिंग आपल्या ताब्यात घेतले. मात्र पेंटिंग ताब्यात येण्याआधीच एदुआर्दोने या पेंटिंगच्या सहा हुबेहूब नकला बनवून जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये आधीच पाठवून दिल्या होत्या. कारण एकदा मूळ पेंटिंग लूव्रमधून चोरीला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व ठिकाणी पोलीस, कस्टम्स विभाग अतिशय सतर्क असतील याची पुरेपूर कल्पना त्याला होती. पेंटिंग चोरीला गेल्यानंतर एदुआर्दोने या सहा नकला हेच मूळ पेंटिंग असल्याचे सांगत यांची विक्री केली. या विक्रीच्या माध्यमातून लाखो डॉलर्सची कमाई केलेला एदुआर्दो मात्र त्यानंतर पुन्हा कधीच दिसला नाही, किंवा पोलिसांच्या तावडीतही सापडला नाही.

Leave a Comment