बीसीसीआयने शेअर केला जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा एरियल व्ह्यू फोटो


नवी दिल्ली : आपल्या ट्विटर हॅन्डलवरून जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचा एरियल व्ह्यू असणारा फोटो भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शेअर केला आहे. मोटेरा स्टेडियम असे या स्टेडियमचे नाव असून अहमदाबाद येथे हे स्टेडियम आहे. बीसीसीआयने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 1 लाख 10 हजार लोक बसण्याची क्षमता या स्टेडियमध्ये आहे.

दरम्यान, 2019मध्ये स्टेडियमचे काही फोटो गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (जीएस) उपाध्यक्ष परिमल नथवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, या स्टेडियमचे तेव्हा काम सुरू होते. त्यांनी दावा केला होता की, हे स्टेडियम मेलबर्न क्रिकेट स्टेडियमपेक्षाही मोठे असणार आहे.

मेलबर्न स्टेडियम हे आतापर्यंत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जात होते. ज्यामध्ये 90 हजार लोक एकत्र बसून क्रिकेटचे सामने पाहू शकत होते. मोटेरा स्टेडियमचे फोटो शेअर करताना बीसीसीआयकडून लिहिण्यात आले आहे की, मोटेरा स्टेडियम अहमदाबाद, इंडिया. ज्यामध्ये 1 लाख 10 हजारपेक्षा जास्त लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.


स्टेडियमचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. 24 फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, याच स्टेडियमध्ये ते एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण शहरात हेलिकॉप्टरमार्फत चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. 11 हजारपेक्षा अधिक पोलीस अहमदाबादमध्ये तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

1 लाख 10 हजारहून अधिक लोक मोटेरा स्टेडियममध्ये ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहणार आहेत. एक लाख लोकांच्या बसण्याची स्टेडियममध्ये व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात येणार आहे. या स्टेजसमोर 14 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Leave a Comment