तुकाराम महाराजांच्या वंशजांचे इंदुरीकर प्रकरणावर भाष्य


पुणे – एका कीर्तना दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राज्यात मोठा वाद उभा राहिला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांसह अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्या समर्थनार्थही अनेक लोक पुढे येत आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या वादावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा आहे. इंदुरीकरांचे कीर्तन त्यात बसत नाही. त्याचबरोबर कमी दर्जाचे त्यांचे विनोदही असतात, अशी टीका केली आहे.

ओझर येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे त्यांनी म्हटले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यावर आक्षेप घेतल्याने वादाला तोंड फुटले. त्यानंतर त्यावर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. इंदुरीकर यांच्या वक्तव्याचा राजकीय नेत्यांनी निषेध केला. तर त्यांच्या समर्थकांनी आंदोलनाची हाकही दिली आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी या वादात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनांचा वादावर कठोर शब्दात समाचार घेतला आहे.

यापूर्वीच इंदुरीकरांवर चर्चा व्हायला हवी होती. महाराष्ट्रात कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा आहे. त्यात इंदुरीकरांचे कीर्तन बसत नाही. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकोबा यांचा तर आपण इंदुरीकरांसारखे कीर्तन करताना विचार करू शकत नाही. गेली ५०-५५ वर्षे मी कीर्तन ऐकत आहे. त्यामध्ये मामासाहेब दांडेकर व त्यांच्याही आधीच्या किर्तनकारांची किर्तने ऐकली आहेत. पण कोणाच्याही कीर्तनामध्ये अशाप्रकारचे विनोद पूर्वी नव्हते. अलिकडेच ही लाट आली आहे. त्यांच्या किंवा काही इतर कीर्तनकारांच्या नावामागे विनोदमूर्ती किंवा विनोदाचार्य असे लिहितात. विनोदाचार्य हे काही किर्तनकाराचे विशेषण नाही.

कीर्तनामध्ये त्यांचे विनोद तर शोभत नाहीतच, पण एकूण ते विनोद म्हणून सुद्धा कमी दर्जाचे आहेत. त्यामध्ये बहुतेकदा स्त्रियांना टार्गेट केले जाते. स्त्रियांवर होणारे हे विनोद व त्याला मिळणारी दाद हे आपली अभिरूची घसरल्याचे लक्षण आहे. मागे कीर्तनसंमेलनात अध्यक्षपदावरून असेच मत व्यक्त केले होते, अशा शब्दात त्यांनी सुनावले आहे.

Leave a Comment