खिल्ली उडवल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटना नाराज


मुंबई – आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची क्लिप व्हायरल झाली असून शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे यामध्ये सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केल्यामुळे आता इंदुरीकर महाराजांवर शिक्षक संघटना नाराज झाल्या आहेत.

त्यांच्या किर्तनातील वादग्रस्त वक्तव्य चार दिवसांपूर्वीच समोर आले होते. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य ओझरमध्ये झालेल्या किर्तनात केल होते. त्या पाठोपाठ आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे.

३५ मिनिटांच्या तासिकेत शिक्षक पाच मिनिटे तर शिक्षक वर्गात जाण्यासाठी घालवतात. त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटे घालवतात. त्यानंतर आदल्या दिवशी काय झाले ते सांगायला आणखी पाच मिनिटे घेतात. उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही उरलेल्या वेळात पाच मिनिटे घेतात. त्यानंतर काय मग तास संपला हे सांगायचीच वेळ येते. असे म्हणत शिक्षक त्यांना शिकवण्याची तासिका आटोपती घेतात असेही इंदुरीकर महाराज या क्लिपमध्ये सांगत आहेत.

सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराज शिक्षकांची नोकरी कशी आरामदायी आहे हे सांगू पाहात आहेत पण त्यांनी ते स्वतः शिक्षक आहेत हे विसरु नये असे काही शिक्षकांनी सुचवले आहे. तर इंदुरीकर महाराज हे स्वतः शिक्षक आहेत त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलीन करु नये असेही काही शिक्षकांनी सुचवले आहे. यासंदर्भातील वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

महाराष्ट्रात किर्तनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आहे. काही वेळा या किर्तनात विडंबनही केले जाते. उपहासात्मक भाष्यही केले जाते. हे सगळे प्रकार महाराष्ट्राला ज्ञात आहेत. किर्तनकारांचा त्यामध्ये हेतू हा प्रबोधनाचा असतो हेदेखील महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण शिक्षकांची अशा प्रकारे खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी असल्याचे मत अॅक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केले आहे. तर अशा प्रकारे शिक्षकांवर भाष्य करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी दिली आहे.

Leave a Comment