‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा टिझर तुमच्या भेटीला


मागील काही दिवसांपासून पुण्यात ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!!’ असे लिहिलेले होर्डिंग्ज चर्चेत आली होती. आता त्या मागचे कारण समजले असून हे होर्डिंग्ज ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावाच्या मराठी चित्रपटामुळे झळकले होते. सध्या तरुणाईत या चित्रपटाची चर्चा असून नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.

कोणतेही पात्र ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चित्रपटाच्या टिझरमध्ये दाखवण्यात आलेले नाही. ‘हॅलो… मी सविता…तुझी सविता… तुम्हाला माहीत असलेली पण तुम्ही कधीही न पाहिलेली’… अशा प्रकारे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. अख्खे शहर वाट बघतंय तुझी! अशा कॅप्शनसहीत हा टिझर अभिनेत्री पर्ण पेठे हिने शेअर केला आहे.

पुण्याच्या रस्त्या रस्त्यावर आणि चौकाचौकात गेल्या एक-दोन दिवसांपासून लागलेल्या एका होर्डिंगने पुणेकर पुरते गोंधळून गेले होते. ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!!’ असे लिहिलेल्या होर्डिंग्जची सगळीकडेच जोरात चर्चा सुरू होत्या. या होर्डिंगवर बाकी काहीही लिहिलेले नसल्याने हे होर्डिंग्ज सध्या चर्चेचा विषय ठरले होते. आता याचे उत्तर गोंधळलेल्या पुणेकरांना मिळाले असून या सर्व खटाटोप चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असल्याचे समोर आले आहे.


या चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपटात दिसणार आहे. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता आलोक राजवाडे हा करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. चित्रपटाचे पोस्टर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. ६ मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment