पवारांचे गृहमंत्र्यांना पत्र; कार्यक्रमस्थळी पोलिसांना बसण्याची मुभा द्या


मुंबई – राज्यातील कोणत्याही ठिकाणी सभा, कार्यक्रम सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना खूपकाळ उभे राहावे लागते. त्यामुळे अशा ठिकाणी त्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्यासाठी मुभा देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

शरद पवार यांनी स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त मिरजमधील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना शरद पवार यांनी पत्र दिले आहे.

त्यांनी आयोजक व उपस्थितांचे राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. पोलीस प्रशासनावर जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी विशेष ताण असतो. पोलीस कर्मचाऱ्यांना इतर वेळी तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते.

केवळ पोलीस कर्मचारीच नव्हे तर नाही ,तर पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील अशा सभाप्रसंगी तिष्ठत उभे राहतात. पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी सभेच्या बंदोबस्तावेळी तत्पर व सज्ज असावयास हवे. पण, सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असे मला वाटते.

तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नसल्याचेही पत्रात शरद पवार यांनी म्हटल्यामुळे सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात. तसेच पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत तशी मुभा असावी, असेही शरद पवार यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment