आता उमा भारतींनी केली मोदींची छत्रपतींशी तुलना


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे पुस्तक काही दिवसांपुर्वीच भाजपच्या एका नेत्याने प्रकाशित केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता भाजप नेत्या उमा भारती यांनी पुन्हा मोदींना छत्रपती संबोधले आहे. एक ट्विट करून छत्रपती मोदी जिंदाबाद असे त्यांनी म्हटले आहे.


उमा भारती यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर सलग 3 ट्विट केले. देशातील राज्यामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकींच्या निकालामधून हे स्पष्ट झाले आहे की, भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणारा दुसरा नेता नाही. मोदींना आणि मोदींनी संपूर्ण देशाच्या जनतेला आपलेसे करुन घेतले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये छत्रपती मोदी जिंदाबाद!, असे म्हटले आहे.

नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणारे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आले होते. हे पुस्तक जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने लिहिले असून, पुस्तक प्रकाशित केल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती. दिल्लीच्या भाजप कार्यालयात ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. यावरुन भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपला नमते घ्यावे लागले होते. आता पुन्हा उमा भारती यांच्या ट्विटवरून वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment