१४४ रुपयांनी महाग झाला विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर


नवी दिल्ली – विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची (एलपीजी) किंमत सरकारी कंपनी इंडियन ऑईलने १४४ रुपयांनी वाढविली असून हे दर आजपासून लागू झाले आहेत.

१ जानेवारी २०२० पासून एलपीजी सिलेंडरचे दर वाढविण्यात आले नव्हते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्लीत इंडेन गॅसची किंमत ८५८.५० रुपये (१४४.५० रुपयांची दरवाढ) असणार आहे. कोलकात्यात गॅस सिलेंडरची किंमत ८९६ रुपये (१४९ रुपयांची दरवाढ), मुंबईत ८२९.५० (१४५ रुपयांची दरवाढ) रुपये सिलेंडरची किंमत आहे. चेन्नईत १४७ रुपयांनी सिलेंडरची किंमत वाढून ८८१ रुपये झाली आहे.

देशात एलपीजीचे वितरण करणारी इंडियन ऑईल ही इंडेन नावाची सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या, एपलीपीच्या ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे सिलेंडरची खरेदी करावी लागते. दरवर्षी १४.२ किलोच्या १२ सिलेंडरसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. ही अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर आणि विदेशी विनिमय चलनाचा दर याप्रमाणे अनुदानाची रक्कम बदलत असते.

Leave a Comment