जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला दिले ‘कोविड 19’ हे अधिकृत नाव


जिनेव्हा – कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे चीनमध्ये बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. एक हजांराच्याही वर चीनमध्ये मृतांचा आकडा गेला आहे. पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसला ‘कोविड 19’ (COVID-१९) हे एक अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिले आहे.

कोरोना व्हायरसच्या नावाची व्याख्या करण्यात आली असून हे नवे नाव त्यानुसार देण्यात आले आहे. को म्हणजे कोरोना, वि म्हणजे व्हायरस तर डी म्हणजे डिसीज अशी व्याख्या करण्यात आली. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रीयसस यांनी दिली. ४२ हजार नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून १ हजार १४० वर मृत्यूचा आकडा गेला आहे. चीनबाहेर २४ देशांमधील ३९३ नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

या व्हायरसची लागण झाल्याचे डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात पहिल्यांदा समोर आले होते. कोराना व्हायरस संसर्गामुळे दोन बळी चीनबाहेर गेले आहेत. त्यातील एक बळी हाँगकाँगमध्ये आणि दुसरा फिलिपाईन्समध्ये गेला आहे. तसेच २४ देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

अनेक देशांनी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. हुबेई प्रांतात अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना भारतानेही बाहेर काढले आहे. पण, अजूनही बरेचजण तेथे अडकून पडले आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

Leave a Comment