राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा झाला पाच दिवसांचा


मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. यापुढे सरकारी नोकरदारांना दर शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्याला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. आता त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 29 फेब्रुवारीपासून होईल.

मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर येताच पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचे सांगितले होते. फडणवीस सरकारच्या काळापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. त्यासाठी निवेदने देण्यात आली होती. 45 मिनिटे कामाचा वेळ वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

महिलांसाठी मंत्रालयात विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरविणे, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण ठेवणे या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Comment