राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर 15 कोटींची उधळपट्टी


मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आपला शासकीय बंगला जुने नेते लवकर खाली करत नाही आणि नव्या मंत्र्यांना राहायला बंगला घर मिळत नाही याची चर्चा कायम केली जाते. आता तीन महिने महाविकास आघाडीच्या सरकारला होत आले आहेत. पण गेले काही दिवस मंत्र्यांच्या घरांवरून चर्चा सुरु आहे. मंत्र्यांच्या घर वाटपावरून सुरुवातीला मानापमान नाट्य घडले होते. सुरुवातीला वाटलेली घरे नंतर ज्येष्ठतेनुसार बदलण्यात आली होती. आता या घरांच्या नुतनीकरणावर होत असलेल्या उधळपट्टीवरून टीका होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या 31 बंगल्यांच्या नुतनीकरण्यासाठी एक निविदा काढली आहे. त्यासाठी 15 कोटीचा खर्च दाखविण्यात आला आहे. यात काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक नेता हा मंत्री झाल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे घराची सजावट करत असतो. त्यासाठी बऱ्याचवेळा तोडफोडही केली जाते. घरांमधील पडद्यांपासून ते फ्लोअरिंग पर्यंत सगळेच बदलले जाते. मुळ बंगल्याच्या वास्तूलाच या सततच्या बदलांमुळे धक्का पोहोचवला जातो असेही म्हटले जाते. एका बंगल्यावर साधारणत: ८० लाख ते दीड कोटींचा खर्च होत आहे.

कोणत्या बंगल्यासाठी किती येत आहे खर्च

  • रॉयल स्टोन :- १ कोटी ८१ लाख (छगन भुजबळ)
  • रामटेक :- १ कोटी ४८ लाख (बाळासाहेब थोरात)
  • मेघदूत :- १ कोटी ३० लाख (अशोक चव्हाण)
  • सातपुडा :- १ कोटी ३३ लाख (डॉ. राजेंद्र शिंगणे)
  • शिवनेरी :- १ कोटी १७ लाख (सुभाष देसाई)
  • अग्रदूत:- १ कोटी २२ लाख
  • ज्ञानेश्वरी :- १ कोटी १ लाख (अनिल देशमुख)
  • पर्णकुटी :- १ कोटी २२ लाख (नितीन राऊत)
  • सेवासदन :- १ कोटी ५ लाख (जयंत पाटील)
  • सागर :- ९२ लाख (देवेंद्र फडणवीस)

Leave a Comment