ह्या घरगुती उपचारांनी केस बनवा चमकदार


वर्षातील प्रत्येक बदलत्या ऋतूमध्ये केसांची देखभाल करण्याची पद्धत देखील बदलावी लागते. उन्हाळा असो, किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या केसांची निगा घ्यायला हवी. त्याकरिता आपण सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो, कधी महागडे शॅम्पू वापरून, तर कधी ब्युटी पार्लर मधील महागड्या हेअर स्पा ट्रीटमेंट घेऊन, तर कधी परंपरेने चालत आलेले उपाय अंमलात आणून, आपण आपल्या केसांची योग्य निगा राखण्याचा प्रयत्न करीत असतो. पण आजकाल बदलते हवामान, प्रदूषण, केसांसाठी वापरली जाणारी रसायनयुक्त प्रसाधने वापरल्याने केस अकाली पांढरे होणे, गळणे इत्यादी तक्रारी उद्भवतात. या तक्रारी दूर करण्यासाठी आणि केस नेहमी सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी काही घरगुती उपाय करून बघता येतील.

कांद्याच्या रसामध्ये सल्फर मोठ्या प्रमणात असते. सल्फर मुळे कोलाजेन वाढून केसांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते. हा उपाय करण्याकरीता एक कांदा किसून तो पिळून घ्यावा. हा रस दहा मिनिटे केसांच्या मुळांशी लावून ठेवावा. त्यांनतर केस कोमट पाण्याने आणि शँपूने स्वच्छ धुवावेत. कांद्याच्या रसाचा वास केसांमधून निघाला नाही असे वाटत असल्यास पुन्हा एकदा हलका शँपू वापरावा. कांद्याच्या रसाप्रमाणेच बटाट्याचा रसही केसांसाठी चांगला आहे. बटाटा किसून घेऊन पिळून घ्यावा आणि तो रस केसांना लावावा. दहा मिनिटांनी केस धुवून टाकावेत.

नारळाच्या दुधामध्ये लोह, पोटॅशियम, आणि फॅट्स ची मात्र असते. ह्या तीनही गोष्टी केसांसाठी अतिशय उत्तम आहेत. मात्र केसांना लावण्यासाठी ताजा नारळ खवून त्याचे दुध काढून घ्यावे. बाजारातून आणलेले तयार नारळाचे दुध शक्यतो वापरू नये. नारळाच्या दुधामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालावा आणि तीन-चार थेंब लॅव्हेंडर चे तेल घालावे. हे मिश्रण चार ते पाच तासांसाठी केसांना लावून ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने आणि शँपूने केस धुवावेत.

अॅपल सायडर व्हिनेगर मुळे केसांचा PH स्तर नियंत्रित राहतो. जर केस लांब असतील, तर एक लिटर पाण्यामध्ये ७५ मिलीलीटर अॅपल सायडर व्हिनेगर घालावे, आणि केस लहान असतील, तर एक कप कोमट पाण्यामध्ये १५ मिलीलीटर सायडर व्हिनेगर घालावे. शँपू ने केस धुतल्यानंतर सगळ्यात शेवटी ह्या पाण्याने केस धुवावेत. यामुळे केस चमकदार होतीलच, शिवाय केसांची लांबी वाढण्यासही मदत होईल.

अंड्यातील पांढरा भाग केसांसाठी लाभकारी असतो. यामध्ये प्रथिने, सल्फर, लोह, झिंक, सेलेनियम, आयोडीन आणि फॉस्फरस असल्याने केसांच्या वाढीकरिता ह्याचा चांगला उपयोग आहे. ह्याचा उपयोग केसांसाठी करण्याकरिता अंड्यातील पांढरा भाग एका भांड्यामध्ये काढून चांगला फेटून घ्यावा. यामध्ये एक लहान चमचा ऑलिव्ह ऑईल घालावे. ऑलीव्ह ऑईल च्या ऐवजी ग्रेपसीड ऑईल किंवा लॅव्हेंडर ऑईल ही वापरता येईल. ह्या मिश्रणामध्ये एक लहान चमचा मध घालून हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे आणि आपल्या केसांना वीस मिनिटे लावून ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने व शँपूने केस धुवावेत. अंड्यातील पांढरा भाग केसांसाठीच नाही, तर त्वचेसाठी देखील अतिशय चांगला आहे.

मेथीचे दाणे किंवा मेथ्या केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेली प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड केसंकारिता अतिशय फायदेशीर आहेत. मेथी दाणे केसांकरिता वापरण्यासाठी मेथी दाणे काही तास थोड्याश्या पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत. पाण्यामध्ये ठेवल्याने मेथी दाणे फुगतात. त्यानंतर हे मेथी दाणे मिक्सरवर वाटू घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ह्या पेस्टमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिसळावे आणि हे मिश्रण केसांना अर्धा तास लावून ठेवावे. त्यानंतर केस शँपूने धुवून टाकावेत. मेथी दाण्यांमुळे केसांचे आरोग्य आणि नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत मिळते.

आपले आरोग्य सांभाळण्याकरिता आपण ग्रीन टी चा वापर करीत असतो. हा ग्रीन टी आपल्या एकंदर आरोग्याकारीतच नव्हे, तर केसांकरिताही चांगला आहे. ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक मात्रेमध्ये असतात. ह्यामुळे केस चमकदार तर होतीलच शिवाय केसाच्य मुळांना पोषण मिळून केस गळण्याचे प्रमाणही कमी होते. ग्रीन टी केसांकरिता वापरण्यासाठी ग्रीन टी कोमट करून केसांना तासभर लावून ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवून टाकावेत.

आवळा केसांकरिता अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेले क जीवनसत्व केसांच्या आरोग्याकरिता अतिशय लाभकारी आहे. केसांना लावण्याकरिता आवळ्याचे तुकडे करून ते वाळवावेत, आणि त्याची पूड करावी. आवळ्याची तयार पूड बाजारातही उपलब्ध आहे, तिचाही वापर करता येईल. दोन लहान चमचे आवळ्याची पूड घेऊन त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण केसांना लावावे, व ते वाळेपर्यंत केसांवर राहू द्यावे. त्यानंतर शँपू आणि कोमट पाणी वापरून केस धुवावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment