अंतिम सामन्यात राडा घातल्याप्रकरणी दोन भारतीयासह पाच जण दोषी


दुबई – भारत-बांगलादेशच्या युवा खेळाडूंमध्ये आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर राडा झाला. या प्रकरणामध्ये पाच खेळाडूंना आयसीसीने दोषी ठरवले असून त्यात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

बांगलादेशचे खेळाडू विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर जल्लोष करण्यासाठी मैदानावर धावून आले. यातील काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना पाहून आक्षेपार्ह इशारे केले. यादरम्यान, दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. वेळीच पंचांच्या मध्यस्थी करत वाद सोडवला. आयसीसीने मोहम्मद तोवहीद हृदय, शमीम होसैन आणि रकिबुल हसन या बांगलादेशी खेळाडूंसह आकाश सिंग व रवी बिश्नोई या दोन भारतीय खेळाडूंना दोषी ठरवले आहे.

आयसीसीचे कलम २.२१ चे उल्लंघन केल्याचा पाचही दोषी खेळाडूंवर आरोप आहे. तर बिश्नोईवर या कलमासह आणखी एक कलम २.५ चा भंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पाचही खेळाडूंनी त्यांची चूक मान्य केली आहे. बांगलादेशचा दोषी खेळाडू हृदयला या प्रकरणात दहा निलंबन गुण मिळाले आहेत आणि दोन वर्षांसाठी हे गुण त्याच्या नावावर कायम राहणार आहेत. शमीमला ८, तर रकिबुलला ४ निलंबन गुण देण्यात आले आहेत. भारताच्या आकाश सिंगला ८ निलंबन गुण, तर रवीला ५ निलंबन गुण देण्यात आले आहेत. त्याचबरोबर बिश्नोईला कलम २.५ चा भंग केल्याने, अतिरिक्त २ निलंबन गुण दिण्यात आले आहेत. दरम्यान, बांगलादेश संघाने अंतिम सामना डकवर्थ लुईस नियमानुसार तीन गडी आणि २३ चेंडू राखून जिंकला आणि पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले.

Leave a Comment