महाराष्ट्रात भाजपची सत्ता येत नाही तोपर्यत मी कुठेही जाणार नाही


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तृळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची रवानगी आता केंद्रामध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला शिवसंग्राम पक्षाच्या १८ व्या वर्धापन दिनी बोलताना पूर्णविराम दिला आहे. भाजपची सत्ता महाराष्ट्रात आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. मैदान सोडणाऱ्यांपैकी मी नसून फारकाळ हे सरकार टिकणार नसल्याचेही ते म्हणाले.

मराठा समाजाची लढाई अजून संपलेली नाही. या सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकार कोपर्डी प्रकरणी गंभीर नसल्याने आता आपल्याला याबाबत दबाव निर्माण करावा लागेल. शिवसंग्रामची मराठा समाजाचे आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही मागणी होती, सत्तेत त्यांना वाटेकरी करताना काही अडचणी आल्या. पण आम्ही शिवसंग्रामच्या महत्त्वाच्या दोन मागण्या मान्य केल्या.

आता भाजप मित्रपक्ष शिवसंग्राम युतीचे सरकार पुन्हा येत नाही, मी तोपर्यंत महाराष्ट्र सोडून कुठेही जात नाही. मला अनेकजण विचारत होते तुम्ही दिल्लीला जाणार का? मी मैदान सोडून जाणारा नाही. कर्जमाफीमध्ये नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार? हे स्पष्ट नाही. भरपूर अटी या सरकारने घातल्या आहेत. या सरकारने एक काम प्रामाणिकपणे केले, ते म्हणजे जी कामे चालू होती, त्यांना स्थगिती देणे. हे प्रगती सरकार नसून स्थगिती सरकार असल्याचे फडणवीस म्हणाले.

आम्ही संघर्ष करून वर आलो आहोत, आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लोक आहोत, आमच्या कार्यकर्त्यांना हात लावला, तर याद राखा. कोणतेही गैरवर्तन आम्ही केले नाही. बदल्याच्या भावनेने काम केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आमच्याकडे यायचे, आम्ही त्यांना चांगली वागणूक दिली, त्यांची कामेही आम्ही केली, कधीही त्यांना अपमानित करायचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आम्ही केले नाही. सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका, तो खाली आणल्याशिवाय जनता राहणार नाही, असेही फडवणीस म्हणाले.

Leave a Comment