एचआयव्हीवरील दोन औषधांचा कोरोनावरील उपचारसाठी होणार वापर


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एचआयव्हीवरील दोन औषधे कोरोना व्हायरस संसर्गावर मर्यादित प्रमाणात वापरण्यास भारतीय औषध महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन औषधांना कोरोना व्हायरस संसर्गावर मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने केली होती. लोपिनवीर व रिटोनवीर अशी त्या दोन औषधांची नावे आहेत. श्वसनाच्या रोगांसाठीही त्यांचा वापर करता येतो. कोरोना व्हायरसमुळे न्यूमोनिया होत असल्याने त्यावर ही औषधे मर्यादित प्रमाणात वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसवर चीन व थायलंडमध्ये वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात आला आहे. औषध महानिरीक्षक कार्यालयाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर लोपिनवीर व रिटोनवीर या दोन औषधांचा वापर मर्यादित प्रमाणावर करावा, असे म्हटले आहे. कोरोनाच्या संशयामुळे केरळात २००० लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अमेरिकाही कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील असून यापूर्वी त्यांनी इबोलावर तयार केलेले औषध गुणकारी ठरले आहे.

या औषधाचे नाव रेमडेसीवीर असे असून चीनमध्ये त्याच्यामुळे अनेकांना बरे वाटले आहे. यात क्लोरोक्विन फॉस्फेट, फॅवीपीरावीर या औषधांचाही उपयोग तपासण्यात आला आहे. त्यात रेमडेसीवीर व क्लोरोक्विन ही दोन औषधे प्रभावी ठरली आहेत.१९४० पासून मलेरियावरचे औषध म्हणून क्लोरोक्विनचा वापर केला जात आहे. अमेरिकेच्या गिलीड या कंपनीने रेमडेसवीर हे औषध तयार केले आहे.

Leave a Comment