अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाची डोनाल्ड ट्रम्प यांना ‘क्लिन चीट’


वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने ‘क्लिन चीट’ दिली असून ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत अमेरिकेच्या सिनेटमध्ये मतदान झाले. यात सर्व आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपाबाबत सुरुवातीला मतदान घेण्यात आले. यामध्ये ५२ विरूद्ध ४८ मतांनी ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर, संसदेच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याच्या आरोपाबाबत मतदान घेण्यात आले. यामध्ये ५३ विरूद्ध ४७ मतांनी ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या सिनेटमध्ये ५३ सभासद आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ४७ सभासद आहेत.

सुरुवातीच्या मतदानात रिपब्लिकन पक्षातील डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक मिट रोमनी यांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. पण संसदेच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याच्या आरोपाबाबत झालेल्या मतदानात त्यांनी पक्षाचा आदेश पाळत ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मतदान केले. महाभियोगाला मान्यता मिळण्यासाठी दोन तृतीयांश सभासदांनी त्याच्या समर्थनार्थ मतदान करणे आवश्यक असते. म्हणजेच, रिपब्लिकन पक्षाच्या २० सभासदांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले असते, तरच ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला मंजुरी मिळाली असती.

Leave a Comment