हिंदूविरोधी ठरवत शरद पवारांवर वारकरी परिषदेचा बहिष्कार


मुंबई – राष्ट्रीय वारकरी परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवार हे हिंदूविरोधी असून वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवू नका, असे पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने जारी करण्यात आले आहे. पवार हे हिंदूविरोधी असल्याने त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नये असे देखील या पत्रामध्ये म्हटले आहे. आता यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पत्रक वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी जारी केले आहे. त्यांनी यामध्ये शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करत असल्याचा असा आरोप केला आहे. हिंदू धर्माला, तर कधी रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पवार पाठिंबा देत असल्यामुळेच यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्रक महाराजांनी जारी केले आहे.

२०१८ सालचा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा ‘ग्यानबा तुकाराम पुरस्कार’ वक्ते महाराजांना मिळालेला आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांची जवळीक असल्याची चर्चा नेहमीच होत असते. वारकरी संप्रदायामध्ये त्यांना हिंदुत्ववाद्यांबरोबर काम करणारे म्हणून ओळखले जाते. वारकरी परिषदेचा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात असणाऱ्या वारकऱ्यांवर प्रभाव आहे. खास करुन मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भामध्ये वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच वक्ते महाराजांनी जारी केलेल्या या पत्रकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment