आता ऑनलाईन पुरवले जाणार तळीरामांचे चोचले


चंदीगडः सध्याच्या डिजीटल युगात आपण कोणतीही गोष्ट स्मार्टफोनच्या माध्यमातून एक क्लिकवर घरपोच मागवू शकता. त्यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे तळीरामांची सर्वात प्रिय दारु…महाराष्ट्र सरकारनेही घरपोच दारु पोहचविण्याची योजना आणली होती. पण, ती योजना यशस्वी झाली नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लवकरच दारूची होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) मिळणार आहे. ही योजना पंजाब सरकारे आखली असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. दारूची घरपोच सेवा देणारे पंजाब पहिले राज्य ठरणार आहे. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

२०२०-२१ या वर्षासाठी नवीन धोरणाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. राज्य सरकारने या धोरणात मोहालीमध्ये ट्रायल म्हणून एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात दारूची होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. ही योजना राबवताना शहरातील सर्व परवानाधारक दारू विक्रेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी या चर्चेनंतर करण्यात येणार आहे. दुकानदारांनी जर यावर आक्षेप घेतला तर ही योजना बंद करण्यात येईल, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दारू विक्रेत्यांसमोर पंजाब सरकारने हा प्रस्ताव ठेवला आहे. ऑनलाइन डिलिव्हरी व्यवस्था लागू करण्यासाठी सरकारपुढे अनेक अडचणी आहेत.

वकील अजय जग्गा संविधानाच्या कलम ४७ चा दाखला देत म्हणाले की, दारू सारख्या पदार्थांवर बंदी आणण्याऐवजी सरकार त्याची घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेत आहे, हे दुर्दैवी आहे. ऑनलाइन दारूविक्री ही संविधान विरोधी आहे. दारूला यामुळे प्रोत्साहन मिळेल. ऑनलाइन दारू खरेदी करणारी व्यक्ती २५ वर्षाची आहे की, १५ वर्षाची हे कसे समजणार, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. दारूची मोहाली, जीरकपूर आणि खरार या परिसरात दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. दारू विक्रेत्यांना सरकारच्या या निर्णयामुळे नुकसान सहन करावे लागणार आहे, काही दुकान विक्रेते सोडल्यास अनेक जण याविरोधात असल्याची माहितीही समोर आली आहे.

Leave a Comment