आता जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार सरपंचाची निवड


मुंबई – थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात मागील फडणवीस सरकारने केलेला कायदा ठाकरे सरकारने रद्द केल्यामुळे आता थेट ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार आहे. हा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय मागील भाजप सरकारने घेतला होता. पण ठाकरे सरकारने हा निर्णय आता रद्द केला आहे. काही ग्रामपंचायतींनी तसेच सरपंचांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. परंतु, तरीदेखील महाविकास आघाडी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे.

सरपंचाची निवड झाल्याने जनतेमधून सरपंच एका विचारांचा आणि सदस्य इतर विचारांचे निवडून येतात. त्यामुळे याचा विकास कामांवर परिणाम होतो, असा आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला होता. तसेच सरपंच म्हणून जनतेतून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारीही येत होत्या. त्यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांनी जनतेतून होणारी थेट सरपंच निवडणूक रद्द करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Leave a Comment