50 जणांनी शिटी वाजवून तयार केले ‘मिले सुर मेरा तुम्हारा’चे नवीन व्हर्जन

अनेक दशक जुने लोकप्रिय ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे गाणे तुम्हाला माहितीच असेल. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण अनेकदा हे गाणे ऐकतो. आता जगभरातील 50 भारतीयांनी या गाण्याचे एक नवीन व्हर्जन तयार केले आहे. 71 व्या प्रजासत्ताक दिन्याच्या निमित्ताने इंडियन व्हिस्लर्स असोसिएशनच्या (आयडब्ल्यूए) 50 सदस्यांनी शिटी वाजवून ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे गाणे तयार केले आहे.

हे नवीन व्हर्जन भारतातील 18 शहरे, अमेरिका आणि मलेशियामधील 50 पेक्षा अधिक भारतीयांनी शिटी वाजवून तयार केले आहे. 6 मिनिटे 11 सेंकदांचा हा व्हिडीओ प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला आयडब्ल्यूएकडून रिलीज करण्यात आला आहे.

युट्यूबवर गाण्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आम्ही तुमच्यासाठी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ 2020 घेऊन आलो आहोत. यामध्ये 17 विविध जाती आणि 18 भारतीय शहर व परदेशातील 50 व्यक्तींनी भाग घेतला आहे.

आतापर्यंत 91 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला असून, शेकडो युजर्सनी कमेंट्स करत या नवीन व्हर्जनचे कौतूक केले आहे.

आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सने देखील ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत या गाण्याचे कौतूक केले.

‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे गाणे 15 ऑगस्ट 1988 ला रिलीज झाले होते. या गाण्यासाठी संगीतातील दिग्गज पंडीत भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि एम बालामुरलीकृष्णन हे एकत्र आले होते.

या गाण्यात अमिताभ बच्चन, शबाना आझमी, मल्लिका साराभाई, हेमा मालिनी, कमल हसन, तनूजा आणि जावेद अख्तर देखील होते.

Leave a Comment