निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची फाशी कायम


नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राजधानी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका फेटाळून लावल्यामुळे आता मुकेशला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यापूर्वी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. मुकेशने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, ही याचिका फेटाळत न्यायालयाने राष्ट्रपतींच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

१ फेब्रुवारी ही तारीख निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी निश्चित करण्यात आहे. या चौघांना तिहार तुरुंगात फाशी दिली जाईल. पण, आरोपींकडून गेल्या काही दिवसांपासून शिक्षेची तारीख लांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुकेशची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिक्षेविरोधात दाद मागण्याचे त्याचे सर्व कायदेशीर प्रयत्न संपुष्टात आले आहेत.

ही सुनावणी न्यायमूर्ती भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर झाली. न्यायमूर्ती भानुमती यांनी यावेळी म्हटले की, खटल्याशी संबंधित योग्य कागदपत्रे राष्ट्रपतींसमोर सादर करण्यात आली की नव्हती, एवढेच पाहणे न्यायालयाचे काम आहे. राष्ट्रपतींसमोर मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली, असा दावा केला होता. पण, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.

Leave a Comment