पहिल्याच दिवशी राज्यातील एवढ्या लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ


नाशिक- राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ लोकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन थाळी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत १२२ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली असून या केंद्रांच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. आमच्या शासनाची शिवभोजन ही प्रमुख योजना असून राज्यात तिची काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी योजना स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालये, रेस्टॉरंटच्या माध्यमातून राबवली जात आहे. ज्या केंद्रांना योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत त्या केंद्रातून योजने अंतर्गत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थींच्या १० रुपयांच्या रक्कमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्र चालकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Leave a Comment