आपण खातो ती सर्वच बिस्किटे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत का?


आजकाल ‘ओटमील ‘, ‘ होल व्हीट ‘ , ‘ लाईट ‘ किंवा ‘ डायजेस्टिव्ह ‘ अशी अनेक तऱ्हेची बिस्किटे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. शिवाय टीव्हीवर या बिस्किटांच्या केल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून ही बिस्किटे अतिशय पौष्टिक असल्याची ग्वाही सतत दिली जाते, त्यामुळे आपण ही आता अश्याच प्रकारच्या बिस्किटांची निवड करु लागलो आहोत. पण आहार तज्ञांच्या मते ही बिस्किटे अतिशय हुशारीने केलेल्या ‘ लेबलिंग ‘ मुळे ग्राहकांना भुरळ घालतात. या बिस्किटांमध्ये वापरली जाणारी साखर आणि इतर प्रिझर्व्हेटीव्हज् जरी मर्यादित प्रमाणात वापरली जात असली, तरी देखील बिस्किटे खरेदी करताना, त्या मध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू कोणत्या आहेत, हे बिस्किटांच्या लेबल वर पाहणे अतिशय आवश्यक आहे.

भारतामध्ये बनविल्या जाणाऱ्या निरनिराळ्या ब्रँडच्या क्रीम बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण दर शंभर ग्रॅम बिस्किटांच्या मागे ३० ग्रॅम पेक्षा ही अधिक असते. वैद्यकीय दृष्ट्या पहाता, वर्ल्ड हेल्थ असोसिएशन च्या म्हणण्याप्रमाणे, हे प्रमाण वास्तविक २० ते २५ ग्रॅम्स पेक्षा अधिक नसायला हवे. तसेच फॅटचे प्रमाणही दर शंभर ग्रॅममागे २० ग्रॅम पेक्षा कमी असायला हवे. पण क्रीम बिस्किटांमध्ये साखर आणि फॅट या दोन्हीचे प्रमाण पुष्कळ जास्त असते. बिस्किटांच्या पाकिटावर लेबलिंग जरी शंभर ग्रॅम बिस्कीटांसाठी दिलेले असले, तरी वास्तविक त्या पॅकेट मधील बिस्किटांचे वजन साद्धारण २५० ग्रॅम्स असते. त्यामुळे एखादी व्यक्ती जर एका वेळी बिस्किटांचा अख्खा पॅक संपवत असेल, तर ती व्यक्ती किती साखर आणि फॅट चे सेवन करीत असेल याचा हिशोब लावणे अवघड नाही.

जर एखादे बिस्कीट ‘ शुगर फ्री ‘ किंवा ‘ फॅट फ्री ‘ असले, तरी ही ती बिस्किटे कुरकुरीत बनविण्यासाठी किंवा त्यांना साखर न वापरता कृत्रिम गोडवा देण्यासाठी कोणते पदार्थ वापरले गेले आहेत, ह्याची माहिती लेबल वाचून मिळविता येते. लेबल मध्ये बिस्किटांमध्ये असलेली कर्बोदके आणि साखर वेगवेगळे दिलेले असतात. पण शरीरामधील कर्बोदकांचे रूपांतर साखरेतच होत असल्याने या दोहोंचा वेगळा विचार करणे योग्य आहे का? त्याशिवाय बिस्किटांमध्ये असणारे ग्लुकोज, फ्रुक्टोज, कॉर्न स्टार्च, कॉर्न सिरप या पदार्थामध्ये ही साखर मोठ्या प्रमाणावर असते.

बिस्किटांमध्ये कॅलरीज ही भरपूर असतात. एका बिस्कीटामध्ये सुमारे ४० कॅलरीज असतात, आणि आपल्यापैकी कोणीही केवळ एक बिस्कीट खाऊन थांबत नाही. त्या पेक्षा एका फुलक्यामध्ये ८० कॅलरीज असतात, आणि तो एक फुलका आपली भूक शमवू शकतो. तसेच बिस्किटांमध्ये इमल्सीफायर्स, प्रिझर्व्हेटीव्हज् , खाण्याचे रंग या स्वरूपामध्ये अनेकविध रसायनांचा ही वापर केलेला असतो. बिस्किटे टिकून राहण्याकरता या रसायनांचा वापर करण्यात येतो. तसेच सल्फाईट, ब्रोमेट अश्या ही पदार्थांचा वापर बिस्किटांमध्ये होतो. हे पदार्थ रक्तदाबासंबंधी विकारांना कारणीभूत ठरू शकतात.

या शिवाय बिस्किटांमध्ये साखरेसोबत मिठाचे ही प्रमाण जास्त असते. मीठासोबतच सोडा बाय कार्ब ही बिस्किटांमध्ये असतेच. त्याशिवाय शुगर फ्री बिस्किटे गोड बनविण्यासाठी अस्पारटेम, सुक्रलोज यांसारखे पदार्थ ही असतात. ह्या पदार्थांमुळे शरीराच्या चयापचयावर दुष्परिणाम होतात. शुगर फ्री म्हणवणाऱ्या बिस्किटांमध्ये अस्पारटेम सारख्या प्रमाणाचा मोठ्या प्रमाणावर झालेला वापर मधुमेहाच्या रुग्णांना हानिकारक ठरू शकतो. बिस्किटांवर असलेले लेबल जरी बिस्किटे ‘ ओटमील ‘ किंवा ‘ होल व्हीट ‘ युक्त असल्याचे सांगत असले, तरी या मध्ये ओटमील किंवा होल व्हीट चे प्रमाण केवळ वीस ते पंचवीस टक्के इतकेच असून, मैदा, साखर आणि तत्सम पदार्थांचे प्रमाण जास्त असते.

आता प्रश्न उरतो तो हा, की बिस्किटे कोणती आणि किती खावीत? काही आहारतज्ञांच्या मते दिवसाकाठी दोन ते तीन मारी बिस्किटे, किंवा दोन क्रीम क्रॅकर्स खाणे पुरेसे आहे. किंवा प्रथिनांनी आणि जीवनसत्वांनी युक्त थ्रेप्टीन बिस्किटे ही चांगली. तर काही आहारतज्ञांच्या मते, बिस्किटांना आपण अजिबातच फाटा द्यायला हवा. त्याऐवजी सुका मेवा आपल्या हारात समाविष्ट करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment