मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना


मुंबई : रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका. हा मान फक्त बाळासाहेबांचा असल्याची, सूचना राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पाडत आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे फक्त १० मिनिटे उपस्थित असले तरी त्यांनी या दरम्यान काही महत्त्वाच्या सूचना केल्याचे कळते. २३ जानेवारीच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे.

मनसेचा ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चा आहे. या मोर्चाचे आयोजन पाकिस्तान आणि बांग्लादेशातील घुसखोरांच्या विरोधात करण्यात आले आहे. या मोर्चाबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. शॅडो कॅबिनेटबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असल्याचेही बाळा नांदगावकरांनी म्हटले आहे.

मनसेने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा विचार आणि नवा ध्वज याच्यासह नवी सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्या अधिवेशनात शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. एवढ्या वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचे अचूक टायमिंग राज ठाकरे यांनी साधले आहे. पण आधीपासूनच हिंदुत्व हा आमचा मुद्दा असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले होते.

आता नव्याने हिंदुत्वाची वाट मनसेने धरल्याने राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या. असे बॅनर देखील अनेक ठिकाणी झळकले. मनसेने पहिल्या अधिवेशनात आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. मनसे सीएए आणि एनआरसीच्या समर्थनात उतरली आहे. पण हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे यांना म्हटल्यामुळे शिवसेनेकडून यावर टीका ही करण्यात आली.

Leave a Comment