ओस्टीयोपोरोसीस बद्दल काही गैरसमज


ओस्टीयोपोरोसीस ह्या हाडांशी निगडीत असलेल्या आजाराने भारतातील एकूण ऐंशी टक्के महिला ग्रासलेल्या आहेत, तर सुमारे १.५ मिलियन पुरुषांमध्ये हा आजार पहावयास मिळत आहे. भारतीय लोकांमध्ये उच्च रक्तदाब, आणि हृदयरोग हे विकार प्रामुख्याने आढळतात. आता या विकारांच्या बरोबरीने ओस्टीयोपोरोसीस हा विकारही मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागला आहे. लक्षात घेण्यासारखी बाब ही, की हा विकार हाडांची घनता कमी झाल्यानंतर, व तशी तपासणी करून घेतल्यानंतरच लक्षात येतो. या विकारामध्ये हाडांची घनता कमी होत जाऊन, हाडे ठिसूळ होतात, कमकुवत होऊन झिजू लागतात. या विकाराला ‘ बोन थिनिंग डिसीज ‘, म्हणजे हाडे झिजविणारा रोग असे ही म्हटले गेले आहे. ह्या रोगामुळे हाडे ठिसूळ झाल्याने हातापायांना किंवा इतर हाडांना काही कारणाने अगदी जरासा लागलेला मार, हाड फ्रॅक्चर देखील करू शकतो.

ह्या रोगाची लक्षणे इतर रोगांप्रमाणे लगेच दिसून येत नाहीत, आणि जेव्हा या विकाराचे निदान होते, तेव्हा बहुतेक रुग्णांच्या बाबतीत हा विकार खूपच बळावलेला असतो. आपल्या हाडांमध्ये ‘ओस्टियोक्लास्टस्’ व ‘ओस्टियोब्लास्टस्’ ह्या दोन प्रकारच्या पेशी असतात. एक पेशी जुन्या हाडांना नष्ट करीत असते, तर दुसरी पेशी नवे हाड तयार करीत असते. पण जसजसे व्यक्तीचे वय वाढत जाते, तसेतसे जुनी हाडे झिजत राहतात, पण त्याच वेगाने नवी हाडे तयार होऊ शकत नाहीत. या कारणाने चाळीशीच्या पुढे हाडांची झीज अधिक झालेली दिसते. ओस्टियोपोरोसीस या विकाराबद्दल अनेक गैसमज पहावयास मिळतात. त्यामुळे या विकाराबद्दल योग्य माहिती करून घेणे अगत्याचे आहे.

ओस्टियोपोरोसीस उतारवयातच होतो हा एक मोठा गैरसमज आहे. उतारवयामध्ये हाडांची झीज जास्त प्रमाणात होते हे जरी जरी खरे असले, तरी आजकालची जीवनशैली आणि आहारपद्धती पाहता ओस्टीयोपोरोसीस हा विकार तरुण वयामधेच लोकांना ग्रासत आहे. आहारातून पुरेसे न मिळणारे पोषण आणि व्यायामाचा अभाव या कारणांनी हाडांची झीज होण्यासाठी वयाची मर्यादा राहिलेली नाही. त्याशिवाय काही अंशी हा रोग अनुवांशिक ही समजला जातो.

ओस्टीयोपोरोसीस झाला की हाडे मोडतातच हा आणखी एक गैरसमज आहे. हा रोग असलेल्या पन्नास टक्के व्यक्तींच्या बाबतीत हाडे फ्रॅक्चर्स होत नाहीत. उलट ज्या व्यक्तींना ओस्टीयोपोरोसिस नाही, त्या व्यक्तींनाही अगदी थोडाफार मार लागल्यानेही फ़्रॅक्चर्स होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. हाडांमध्ये फ्रॅक्चर सहजगत्या होऊ शकते किंवा नाही याचा अंदाज ‘ बोन डेन्सिटी टेस्ट ‘ म्हणजे हाडांची घनता तपासणाऱ्या टेस्ट वरूनच घेता येऊ शकतो. त्यामुळे ओस्टीयोपोरोसीस असला की हाडे मोडणारच असे समजायचे काही कारण नाही.

ओस्टीयोपोरोसीस हा विकार केवळ महिलांमध्येच पहावयास मिळतो हा अजून एक मोठा गैरसमज आहे. महिलांची हाडे नैसर्गिक रित्या लहान आणि पुरुषांच्या मानाने काहीशी नाजूक असतात हे जरी खरे असले, तरी जर शरीरामध्ये ‘ ड ‘ जीवनसत्वाची कमी असेल, तर हा आजार पुरुषांना ही होऊ शकतो. आजकाल प्रथिन युक्त आहार घेण्याकडे जास्त कल दिसून येऊ लागला आहे. त्याचबरोबर फॅट्स ला अजिबात फाटा देण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे अंडे खाणाऱ्या व्यक्ती अंड्याचा पांढरा भाग खातात आणि अंड्याचा बलक, म्हणजेच पिवळा भाग वर्ज्य करतात. पण अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये ‘ड’ जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असते, त्यामुळे ह्याचे सेवन अवश्य करावयास हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment