हिवाळ्यामध्ये प्रथिनांची योग्य मात्रा असलेला आहार घेणे श्रेयस्कर


हिवाळयामध्ये शरीराचे सर्वसाधारण आरोग्य चांगले राहावे या करिता कर्बोदके आणि प्रथिने यांची योग्य मात्रा असलेला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये सुका मेवा, डाळी, आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडून निस्तेज दिसू लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याकरिताही त्यासाठी आवश्यक पोषक द्रव्ये असलेले अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावयास हवेत.

थंडीच्या मोसमामध्ये केसांचीही योग्य निगा घेणे गरजेचे असते. त्यासाठी प्रथिनांनी परिपूर्ण अन्नपदार्थांचे सेवन करायला हवे. आपल्या आहारामध्ये टोमॅटो, अंडी, भोपळा, गाजरे, इत्यादी अ जीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे केसगळती थांबून केस चमकदार, निरोगी होतील. अक्रोड, मासे, आणि जवस या पदार्थांचा ही आपल्या आहारामध्ये समावेश करा. या पदार्थांमधील प्रथिने केसांना पोषक आहेत. आपल्या आहारामध्ये दही, बदाम, निरनिराळ्या शेंग-भाज्या, तीळ, इत्यादी पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते. झिंक हे केसांच्या वाढीला पूरक आहे. तसेच योग्य मात्रेमध्ये पाणी प्यावे, आणि संतुलित आहाराला नियमित व्यायामाची जोड द्यावी.

त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी प्राकृतिक ओमेगा ३ असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावेत. ओमेगा ३ त्वचेला आणि ओठांना पुरेश्या मात्रेमध्ये आर्द्रता प्रदान करतात. अक्रोड, जवस, ट्युना किंवा साल्मन हे मासे, यांच्या मध्ये ओमेगा ३ मुबलक मात्रेमध्ये असते. त्याचबरोबर ताज्या हिरव्या पालेभाज्या, बदाम, अंडी, मशरूम्स, शतावरी इत्यादी पदार्थांचे सेवन थंडीमध्ये अधिक प्रमाणात करावे. आपल्या आहारामध्ये कडधान्य, शेंगदाणे, डाळी, इत्यादी नियासिन या पोषक तत्वाने युक्त पदार्थांचा समावेशही करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment