वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्र बंद


मुंबई – वंचित बहुजन आघाडीने आज सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सुमारे २५ ते ३० संघटना या बंदमध्ये सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. आजचा महाराष्ट्र बंद प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आला आहे.

एनआरसी आणि सीएए विरोधात देशभरात प्रचंड रोष आहे. यावरुन अनेक राज्यांमध्ये आंदोलने आणि जाळपोळही झाली. हा कायदा सरकारने लागू केला आहे यामागे त्यांची दडपशाही आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्यामुळेच आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारविरोधात नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे निषेधाचे वातावरण तयार झाले असल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही बंदचे आवाहन केले आहे. आमच्या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास असल्याचे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment