अशी घ्या कुरळ्या केसांची काळजी


अतिशय नीटनेटके स्टायलिंग केलेले कुरळे केस फारच आकर्षक दिसतात. पण ज्या महिलांचे केस कुरळे आहेत, त्यांच्यासाठी दररोज त्यांच्या केसांची निगा राखणे हे मोठेच काम असते. कुरळे केस अगदी सहज गुंततात, आणि गुंता चटकन सुटतही नाही. त्यामुळे केस विंचरताना तुटतात. कुरळे केसांचे स्टायलिंग करणे हे देखील सोप्र काम नसते. पण काही गोष्टींचा अवलंब केल्याने कुरळ्या केसांची निगा राखण्याचे व त्यांचे स्टायलिंग करण्याचे काम सोपे होते.

कुरळ्या केसांची स्वच्छता राखण्यासाठी खास कुरळ्या केसांसाठी तयार केलेला शॅम्पू वापरणे गरजेचे आहे. कुरळे केस लवकर राठ किंवा कोरडे होत असल्याने केसांचा कोरडेपणा नियंत्रित करणारा शॅम्पू आणि कंडीशनर वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे तीव्र रसायने असणारा किंवा अल्कोहोल असणारा शॅम्पू वापरणे टाळावे. अश्या प्रकारच्या शॅम्पूंमुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते. तसेच कंडीशनरचा वापर करताना देखील केसांना आर्द्रता देणारा कंडीशनर वापरणे गरजेचे आहे. कुरळ्या केसांना कंडीशनर लावताना कंडीशनर विशेषतः केसांच्या टोकांशी लावावा आणि दोन तीन मिनिटे राहू द्यावा. त्यानंतर केस पाण्याने धुवावेत. काही व्यक्तींचे केस कुरळे आणि त्याचबरोबर खूप राठही असतात. अश्या व्यक्तींनी केसांसाठी ‘ ‘लिव्ह-ईन’ कंडीशनर वापरावेत. ह्या प्रकारचे कंडीशनर केसांमध्ये लाऊन तसेच राहू द्यायचे असतात. त्यामुळे केस मुलायम राहतात आणि त्यांचे स्टायलिंग करणे सोपे जाते.

कुरळे केस धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने केस धुतल्यानंतर केसांना चमक येते. गरम पाण्याने केस धुतल्यास केस आणखी कोरडे होण्याची शक्यता असते. कुरळे केस स्टाईल करण्याकरता अँटी फ्रीझ्झ सिरम वापरावे. त्याने केसांचे स्टायलिंग करणे अधिक सोपे होते. कुरळे केस विंचरण्यासाठी हेअर ब्रश चा वापर टाळावा. त्याने केस तुटण्याची शक्यता असते. त्या ऐवजी मोठ्या दातांचा कंगवा वापरणे अधिक योग्य ठरेल. मोठ्या दातांच्या कंगव्याने कुरळे केस अधिक न गुंतवता, सावकाश विंचरावेत.

Leave a Comment