रिंकु राजगुरुच्या मेकअपचे नवे गाणे रिलीज


रिंकु राजगुरुच्या आगामी मेकअप या चित्रपटातील नवे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल ‘लागे ना मन’ असे असून या गाण्यात ‘नील’ला ‘पूर्वी’ बद्दल ‘त्या’ खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा भास, ती सोबत नसतानाही त्याला जाणवणारा तिचा सहवास, प्रेमात पडत असल्याची होणारी जाणीव हे सगळे ‘नील’ सोबत होताना दिसत आहे. नील प्रेमात पडल्यावर केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी करत आहे. या गाण्यातून पूर्वीचा पाठलाग, तिला लपून बघणे, चांगले दिसण्यासाठी होणारी धडपड करून पूर्वीचे लक्ष वेधण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न दिसत आहे.

साहील कुलकर्णीने ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला स्वरबद्ध केले असून वैभव देशमुख यांनी प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या भावना अगदी साजेशा शब्दात मांडल्या आहेत. येत्या ७ फेब्रुवारीला गणेश पंडित लिखित दिग्दर्शित ‘मेकअप’ हा चित्रपट रिलीज होत आहे.

या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन अ‌ॅपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत.

Leave a Comment