कोरेगाव भिमा हे तत्कालीन भाजप सरकारने घडवलेले षडयंत्र


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले असून या दंगलप्रकरणातील मूळ सुत्रधार बाजूला ठेऊन बुद्धिजीवी लोकांना अटक केली होती. तत्कालीन भाजप सरकारने हे पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेकडून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सुत्रधारांना पाठीशी घालून, मुख्य मुद्यांवरून लक्ष हटविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला. संगणकीय उपकरणांमध्ये पोलीस तपास यंत्रणेने छेडछाड केली होती. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

जर्मन कवीची ‘जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीये, शहर मैं अगर बगावत ना हो तो बहेतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये’स ही अनुवादीत कविता सुधीर ढवळेंनी वाचल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते जावई आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. गोलपीठामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घ्यावा. त्या कवितेकडे देशद्रोह आणि समाज विघातक म्हणून बघू नये असेही पवार म्हणाले.

एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भीमा कोरेगाव दंगलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. यातील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. यामध्ये काही बुद्धिजिवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

Leave a Comment