गरम पाणी पिण्याचे फायदे


बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या गरमागरम कपाने करीत असतात. काही लोकांना तर सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी मिळाली नाही, तर त्यांचा अख्खा दिवस वाईट जातो, इतकी त्यांना चहा किंवा कॉफीची सवय झालेली असते. पण या सवयीमुळे कालांतराने बद्धकोष्ठ, पोटदुखी, अॅसिडीटी, पिंपल्स अश्या तक्रारी सुरु होतात. असे म्हटले जाते की त्वचा, केस आणि एकंदर शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी पिण्याची सवयही तुमच्या शरीरातील अनेक विकार मुळापासून करू शकते.

सकाळी उठून नियमितपणे एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने पाचन शक्ती चांगली राहते. तसेच गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते. आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आपल्या शरीरामध्ये साठत असलेले घातक पदार्थ गरम पाण्याच्या सेवनामुळे बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते. योगशास्त्राच्या नियमानुसार तीन महिने गरम पाण्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते. या करिता इतर कोणतेही विशेष पथ्य पाळण्याची गरज नाही.

काही लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो. अश्या वेळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. पुष्कळ महिलांना मासिक धर्माच्या दिवसांमध्ये डोकेदुखी सतावते. त्यावेळी नियमित गरम पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो. तसेच या दिवसांमध्ये होणारी पोटदुखी ही गरम पायाच्या सेवनामुळे कमी होते.

दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यांना सतत बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी जाणवत असतील त्यांनी गरम आणि आणि लिंबाचा रस दररोज सेवन करणे उत्तम. या मुळे त्वचेचे आरोग्य देखील चांगले राहून, त्वचेवर पिंपल्स येणे कमी होते. तसेच गरम पाण्याच्या सेवनाने अॅसिडीटीचा त्रास ही कमी होतो. पुष्कळ लोकांच्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक किंवा झोपेच्या वेळा अतिशय अनियमित असतात. शिवाय ज्या लोकांना काही ना काही कारणाने सतत प्रवास करावा लागतो त्यांनाही बाहेरच्या जेवणावरच काम चालवून घ्यावे लागते. परिणामी अॅसिडीटीसारखे विकार पाठीमागे लागतात. अश्या वेळी दररोज सकाळी गरम पाणी पिण्याच्या सवयीने अॅसिडीटीचे प्रमाण कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment