गर्भवतीला वाचवण्यासाठी डॉक्टर व त्यांच्या टीमचा 30 किमी पायी प्रवास

दुर्गम नक्षलग्रस्त भागात उपचाराच्या सुविधा पोहचवणे अवघड असते. अनेक प्रसंगात गर्भवती महिलांना देखील कोणतीही सोय नसल्याने वेळीच उपचार मिळत नाहीत. अशाच एका ओडिसामधील दुर्गम भागात राहणाऱ्या एका महिलेसाठी डॉ. राधेश्याम जेना हे देवदुत बनून आले. राधेश्याम व त्यांच्या टीमने गर्भवती महिलेला 30 किलोमीटर चालत सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहचवले.

ओडिसामधील मलकानगिरी येथील कालीमेला कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये काम करणारे राधेश्याम पल्स पोलिओ अभियानांतर्गत कोडीडुलागुंडी गावात गेले होते. तेथे त्यांना एका गर्भवती महिलेला वेदना होत असल्याचे समजले.

गर्भवती महिला रीनामा बरे या आपल्या घरीच होत्या. गावात पक्का रस्ता नसल्याने त्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले नव्हते.

डॉ. राधेश्याम जेना यांनी सांगितले की, जेव्हा मी रीनामा यांच्या घरी पोहचल्यावर पाहिले की त्यांचा रक्तस्त्राव होत आहे. मी त्यांची सुरक्षित डिलिव्हरी केली, मात्र रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्यांच्या गर्भात आणखी एक बाळ होते. मोबाईल सिग्नल देखील नसल्याने मला सुपीरियर्ससोबत बोलण्यासाठी डोंगराच्या टोकावर जावे लागले. सीडीएमओनी मला सांगितले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलेचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यामुळे रीनामाच्या कुटुंबातील दोघेजण व आमच्या टीममधील 6 जणांनी महिलेला स्ट्रेचरवर झोपवले व कालीमेलाच्या कम्युनिटी  हेल्थ सेंटरमध्ये आणले.

ही टीम दुपारी 12 वाजता निघाली होती. मात्र डोंगरातील दगडांच्या रस्त्यांमुळे त्यांना कम्युनिटी हेल्थ सेंटरपर्यंत पोहचायला रात्रीचे 8 वाजले. हेल्थ सेंटरमध्ये महिलेने एका मृत बाळाला जन्म दिला.

Leave a Comment