50 शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू परत करणार पुरस्कार


औरंगाबाद- देशासाठी पदके जिंकणाऱ्या व उच्च दर्जाच्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून गौरव करण्यात येते. पण त्यांना त्यानंतर कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नसल्यामुळे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी येत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी आपला पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले.

पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विक्रम पुरस्कार मध्य प्रदेशात खेळाडूंना देण्यात येतो, त्याचबरोबर त्यांना शायकीय सेवेची नियुक्ती पत्रे देखील देतात, पण असे आपल्या महाराष्ट्रात असे होत नाही. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना सांगली महानगरपालिकेने मनपात थेट नियुक्ती दिलेली आहे. त्याआधारे औरंगाबाद, पुणे, अमरावती आदी मनपांनी तसा ठराव संमत करून घेतला. पण, कोणतीही कार्यवाही त्यावर पुढे केली जात नाही.

नोकरीची गरज खेळाडूंना असताना बेरोजगार म्हणून दिवस काढावे लागत आहेत. शासन राज्यस्तरीय पदक विजेत्याला थेट नोकरी देते, तर आम्हा पुरस्कार विजेत्यांना काही देत नाही. संपुर्ण राज्यभरातून पुरस्कार वापसीची ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. आमच्यासोबत जवळपास 50 पुरस्कार विजेते आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंना आपापल्या जिल्ह्यात क्रीडा अधिकारी, पुणे संचालनालय, मंत्रालयातील क्रीडा विभागात निवदेन सादर केले आहेत. संबधितांना 10 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यासाठी आम्ही वेळ दिला आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करू, असे निवेदनात म्हटले आहे. तलवारबाजीचे पुरस्कार विजेते सागर मगरे, स्नेहा ढेपे यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे.

Leave a Comment