राज्य मंत्रिमंडळाचा मुंबईतील ‘नाईट लाईफ’ला हिरवा कंदील


मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबईतील नाईट लाईफला मंजुरी देण्यात आली. याबद्दलची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाईट लाईफला मंजुरी मुंबईत तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याची अंमलबजावणी येत्या २७ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण नऊ रहिवासी भागांत याची अंमलबजावणी होणार आहे.

याबाबत माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले, शहरातील मॉल, मिल कंपाऊंड आणि वांद्रे-कुर्ला संकुलाचा काही भाग केवळ याचाच पहिल्या टप्प्यात मुंबई नाईट लाईफमध्ये समावेश आहे. दुकाने किंवा स्टॉल या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरू ठेवता येणार आहेत. अर्थात कोणत्याही दुकानदारावर २४ तास दुकान सुरू ठेवण्याचे बंधन असणार नाही. त्याचवेळी शहरातील पब आणि बारसाठी उत्पादन शुल्क खात्याची नियमावली कायम राहिल. त्यामुळे पब आणि बार रात्री दीड वाजता बंद करणे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे.

शहरातील तरुणाईचा विचार करून नाईट लाईफचा विषय पुढे करण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळाने विचार करून परवानगी दिली आहे. केवळ वेळेची मर्यादा नाईट लाईफच्या काळात शिथिल करण्यात आली आहे. पण दुकाने आणि इतर आस्थापनांवर राज्य सरकारचे इतर सर्व नियम लागू असतील. गरजेप्रमाणे आवश्यक वाटल्यास कारवाईही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील सर्व पोलिस उपायुक्तांशी नाईट लाईफबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Leave a Comment