अखेर राज्यात टॅक्स फ्री झाला ‘तान्हाजी’


मुंबई – महाराष्ट्र सरकारने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत असलेला अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी : द अनसंग वॉरिअर हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. यापूर्वीच इतर काही राज्यांनी तान्हाजी टॅक्स फ्री केला आहे.

बॉक्स ऑफिसवर तान्हाजी द अनसंग वॉरिअर हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर बाराव्या दिवशी तान्हाजीने २०० कोटी रुपये कमाईचा टप्पा ओलांडला आहे. बाराव्या दिवशी या चित्रपटाने सात कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, तान्हाजी चित्रपटाला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुलनेत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाला हवा तेवढा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही.

राज्यात तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करावा, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्याचवेळी राज्य सरकारकडून योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.

Leave a Comment