आधारवरील फोटो जुळला तरच मिळणार ‘शिवथाळी’!


मुंबई : शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्यात आली असून जर आधारवरील असलेला लाभार्थ्याचा फोटो जुळला, तरच ग्राहकाला दहा रुपयात शिवथाळी मिळणार आहे.

राज्यात ‘शिवथाळी’ येत्या प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच 26 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे. दहा रुपयांत भोजन थाळीचा गरजू नागरिकांना आस्वाद घेता येणार आहे. पण ग्राहकांना शिवथाळी घेण्यासाठी आपले आधारकार्ड सादर करावे लागेल. लाभार्थ्याचा चेहरा आणि आधारकार्डावरील फोटो जुळला, तरच थाळी मिळणार आहे.


दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी गरीबाला जेवू घालताय, का त्याची थट्टा करताय? असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला विचारला आहे. सर्वांना बिनशर्त जेवण मिळालेच पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे, असे राम कदम यांनी म्हटले आहे. त्याचसोबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला शिवथाळी योजना फेल गेली, लोकांना जेवण देताय की भीक देताय? असा सवाल विचारला आहे.

राज्य सरकारच्या शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या शिवथाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण असेल. दहा रुपयांना ही जेवणाची थाळी प्रत्येकाला मिळणार आहे. दुपारी 12 ते 2 या दोन तासात शिवथाळी उपलब्ध असेल. शिवथाळीची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी दिवसाला 1950 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला 250, ठाण्याला 1350, औरंगाबादला 500, पुण्याला 1000 तर पिंपरी चिंचवडला 500 थाळी मिळणार आहेत.

Leave a Comment