नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती


मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर, पुणे आणि इतर काही ठिकाणच्या महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंढे यांच्यासह तब्बल वीस सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. तर साखर आयुक्तपदी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली आहे. विक्रीकर सह आयुक्त पदावर संपदा मेहता यांची बदली केली आहे. तर मेट्रोच्या संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. रणजितसिंग देओल यांची मुंबई मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. सर्वपक्षीय राजकारणी नाशिक, नवी मुंबई महापालिकेत त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे याआधी दिसले आहे. तुकाराम मुंढे यांची राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे, ही खासियत असल्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोसे वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.

Leave a Comment