आलियाच्या आईचे वादग्रस्त वक्तव्य; अफजल गुरू बळीचा बकरा


नवी दिल्ली – आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट हिची आई सोनी राझदान यांनी संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरूला बळीचा बकरा बनवण्यात आला होता, असा आरोप केला आहे. सोनी राझदान आणि महेश भट्ट यांनी ट्विटरवरून जम्मू काश्मीरचे निलंबित पोलीस उपाधीक्षक दविंदर सिंह यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकेवर आक्षेप घेतला. संसदेवर २००१ मध्ये अफझल गुरूने हल्ला केला होता. त्याच्या फाशीला आता सात वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सोनी राझदान यांनी आता हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.


आपल्या पतीच्या सुटकेसाठी दविंदर सिंह यांनी १ लाख रूपये मागितल्याचा दावा अफझल गुरूची पत्नी तबस्सुमने केला होता. दविंदर सिंह यांना या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे. अफजल गुरूच्या फाशीवर सोनी राझदान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एखादा व्यक्तींचे निर्दोषत्व सिद्ध झाले तर त्याचा जीव परत कसा आणणार? सहजरित्या मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ नये. अफझल गुरूला बळीचा बकरा बनवले गेल्याची चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


दविंदर सिंह यांना अफझल गुरूच्या फाशीनंतर का सोडण्यात आले, याचीदेखील चौकशी करण्याची मागणी सोनी राझदान यांनी केली आहे. अफझल गुरूसारख्या लोकांवर कसा अत्याचार केला जातो आणि गुन्हेगारांसाठी दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा कशी मिळते, याचीही चौकशी व्हायला हवी, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Leave a Comment