… म्हणून नवरदेव 11 किमी धावत पोहचला लग्नस्थळी

मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये विना बँडबाज्याची निघालेली एक वरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. वरातीमध्ये नवरदेव शेरवानीमध्ये धावताना दिसला व त्याच्यासोबत 50 पेक्षा अधिक लोक देखील होते. ही वरात गणेश नगर येथे राहणाऱ्या फिजिकल ट्रेनर नीरज मालवीयाची होती. तो चक्क नवरदेवाच्या पोशाखात 11 किमी धावून लग्नाला पोहचला. फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने असे केले.

नीरजने सांगितले की, मला आपले लग्न अविस्मरणीय करायचे होते. त्यामुळे लग्नासाठी वरात धावत नेण्याची योजना होती. वधू निकिता बिल्लोरे देखील आपल्या पतीच्या या सरप्राइजमुळे खूष झाली. ती म्हणाली की, मला कधीच वाटले नव्हते की, माझी वरात अशाप्रकारे येईल.

नीरज म्हणाला की, मी लग्नात काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला होता. सुरूवातीला कुटुंबातील सदस्यांनी नकार दिला, मात्र यामागील उद्देश समजल्यानंतर ते तयार झाले. घरातून वरात घोड्यावरच निघाली, मात्र रस्त्यावर पोहचताच आम्ही धावण्यास सुरूवात केली. 18 ते 70 वयोगटातील सर्व लोक वरातीमध्ये होते. सर्वांनी स्वेच्छेने यात भाग घेतला. या वरातीचा ड्रेक कोड पिवळे टी-शर्ट होते.

Leave a Comment