शीर्षासनाचे फायदे


योगासनांमध्ये सर्वात प्राथमिक आसन पद्मासन मानले जाते आणि सर्वात महत्त्वाचे तसेच अनेक फायदे करून देणारे आसन शीर्षासन मानले जाते. शीर्षासन म्हणजे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत जमिनीवर डोके टेकवून डोक्यावर सारा भार टाकून उलटे उभे राहणे. या आसनात डोके खाली असल्याने शरीरातला कमाल रक्तप्रवाह डोक्याकडे म्हणजे मेंदूकडे वहायला लागतो. मेंदूला अधिक रक्त पुरवठा झाल्याने मेंदू सक्रिय, ताजा तवाना होतो. मेंदू हा शरीरातला सर्वात प्रमुख अवयव आहे. शरीरातल्या कोणत्याही अवयवाचे कार्यकलाप मेंदूकडूनच नियंत्रित केले जात असतात. असा हा मेंदू सतेज झाल्याने शरीरातल्या सगळ्याच यंत्रणा सजग होतात. चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात.

मेंदूला या आसनाने प्राणवायू मिळतो आणि आवश्यक ते पोषणद्रव्यही प्राप्त होते. शीर्षासनाने सगळ्याच स्नायूंना व्यायाम मिळतो. स्नायूंमध्ये काही कारणांनी तणाव आला असेल तर तो तणाव कमीत कमी वेळेत शिथील करण्याचा उपाय म्हणजे शीर्षासन. शरीरातला सगळाच रक्तप्रवाह या आसनाने सामान्य पातळीवर येतो आणि रक्तदाबावर नियंत्रण येते. हायपरटेन्शनचा त्रास असणारांनी तर हे आसन दररोज आणि अवश्य केले पाहिजे. शीर्षासनाने डोक्याला सर्वात जास्त व्यायाम मिळत असल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेन या विकारावर चांगलाच उपचार होतो. सध्या डोकेदुखीचा त्रास सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यावर केवळ वेदनाशामक औषधे घेतली जातात ज्यांचे काही दूष्परिणामही असतात. त्याऐवजी नियमाने शीर्षासन केले तर इतर अनेक फायद्यांसोबत डोकेदुखीही कमी होईल आणि औषधांची गरज राहणार नाही.

लैंगिकदृष्ट्या काही कमतरता निर्माण झाल्या असतील तर त्याही शीर्षासनाने कमी होतात. शुक्रजंतुंचा अभाव दूर होतो. प्रोस्ट्रेट ग्रंथीचे वाढणे कमी होते. रजोनिवृत्तीचे त्रासही सुसह्य होतात. एकंदरीत प्रजोत्पादन यंत्रणेचे सगळेच त्रास कमी व्हायला शीर्षासन उपयुक्त ठरते. सर्वात महत्त्वाचा लाभ होतो तो डोळ्यांना. शीर्षासनाने डोक्याकडे वाहणार रक्तप्रवाह डोळयांनाही मिळतो आणि दृष्टीचे तेंज कायम राहते. डोळ्यांच्या संदर्भातल्या सगळ्याच तक्रारी शीर्षासनाने कमी होतात. विशेषत: वाढत्या वयानुसार मंद होणारी दृष्टी शीर्षासनाने कायम तेज राहते. अशा रितीने सगळ्याच स्नायूंना व्यायाम देणारा हा प्रकार आहे. विशेषत: मेंदू आणि डोळे या दोन नाजूक अवयवांना शीर्षासनाने दिलासा मिळतो. रक्तदाबासारखा विकार आटोक्यात रहातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment