नेत्रहिन विद्यार्थ्यांनी ३६ ‘नैसर्गिक वाद्या’तून तयार केले ‘जन गण मन’


आता अवघ्या काही दिवस २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला उरले असून प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत अनेक कलाकृती निर्माण होत आहेत. श्रीरंग फाऊंडेशन आणि ‘फ्रेम मी’ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने याच औचित्याने संगीत अनावरण करण्यात आले आहे. नेत्रहिन विद्यार्थ्यांनी एकत्र येत संगीत ध्वनीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे. दगड, लाठी ही आंदोलनाची प्रतिक मानली जातात. पण संगीतात याच गोष्टींचा उपयोग करुन सूर आणि तालाची त्यांना जोड देत कलात्मक पद्धतीने हे कलाकार व्यक्त झाले आहेत.

आपण सध्या अनैसर्गिक ध्वनीच्या माऱ्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या मोठ्या समस्येतून जात आहोत. नैसर्गिक ध्वनी निर्मितीचे महत्व अशा वेळी पुन्हा एकदा अधोरेखीत होत आहे. दगड, पाणी, लाकूड यातून निर्माण होणारा ध्वनी ऐकण्यासाठीही आल्हाददायक असतो. कलादिग्दर्शक आणि ‘श्रीरंग’चे संस्थापक सुमीत पाटील यांना अशा ३६ नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन राष्ट्रगीत ध्वनीबद्ध करावे अशी संकल्पना सुचली. ध्वनी ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे अशा नेत्रहिन तरुणांना घेऊन ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे.

या संगीताचे काळाचौकी येथील शिवाजी हायस्कूल येथे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. नेत्रहिन तरुणांनी यावेळी देशभक्तीपर गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिग्दर्शक, अभिनेते मकरंद सावंत यांनी केले. देशाच्या हितासाठी विद्यार्थ्यांपासून ते सैनिकांपर्यंत आपण प्रत्येकजण आपापल्या परिने योगदान देत असतो. आपल्याला राष्ट्रगीतातूनआपली ही सार्वभौमत्वता, अखंडता कायम टिकून राहावी, याचे स्मरण होत असते. विशेष म्हणजे ही संपूर्ण कलाकृती नेत्रहिन विद्यार्थ्यांनी साकारणे हे माझ्यासाठी एक नवी दृष्टी देणारे असल्याचे ‘फ्रेम मी’चे संस्थापक भरत शिंदे यांनी सांगितले.

या गाण्यात बासरी, तबला, पेटी या पारंपारिक वाद्यांसह दगड, पाटा-वरवंटा, सूप, पाणी, पिपाणी, घुंगरु अशा ३६ नैसर्गिक वस्तूंचा उपयोग गाण्याचे संगीत तयार करण्यासाठी केला गेला आहे. हे गाणे अंध तरुण कलाकारांनी तयार केले असून हे गाणे त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. प्रशांत बानिया, जयेश बानिया, मनश्री सोमण आणि योगिता तांबे अशी या नेत्रहिन कलाकारांची नावे आहेत. हे गाणे पाहिल्यावर नेत्रहिन कलाकार आपल्याला जगण्याची नवी दृष्टी देतात हे कळते.

कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या गाण्याचे संगीत प्रशांत आणि निशांत यांनी केले असून निला माधव माहोपात्रा, संदेश कदम यांनी संगीत सहाय्य केले आहे. याचे डीओपी आदित्य नाईक, आरती कडवकर तर सौरभ नाईक यांनी व्हिडीओ एडीटींग केले आहे.

Leave a Comment