पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत


पुणे: आता मुंबईत नाईट लाईफ सुरु होणार असून २४ तास मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, थिएटर, पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाची येत्या २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरु होणार आहे. 26 जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केली. त्यातच नाईट लाईफबद्दल मुंबईनंतर पुण्यातही चर्चा सुरू झाली. त्यावर आता आदित्य ठाकरेंनीही संकेत दिले आहेत.

शनिवारी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये सर्जा रेस्टॉरंटचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. हे रेस्टॉरंट प. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मालकीचे आहे. उद्घाटनानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का असा प्रश्न विचारला. त्यावर पुणेकरांकडून प्रस्ताव आला तर नक्कीच पुण्यातही नाईट लाईफ सुरू करण्यात येईल, असे उत्तर आदित्य ठाकरेंनी दिले.

पुणेकरांकडून तसा प्रस्ताव आला तर नाईट लाईफ पुण्यातही सुरू करता येईल. पण आत्ताच ठोस आश्वासन देता येणार नाही. दिवसरात्र मुंबईत जे लोक मेहनत करतात त्यांना रात्री भूक लागल्यावर कुठे जायचे, कुठे खायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. म्हणून ही संकल्पना तेथे सुरू केली. कामगार, कष्टकरी पुण्यातही मोठ्या संख्येने आहेत. अशी सुविधा त्यांनाही उपलब्ध झाली पाहिजे. जर तुमच्याकडून प्रस्ताव आला तर त्याबाबत नक्कीच विचार होऊ शकेल, असे ते म्हणाले.

मुंबईतील अनिवासी भागात असलेले हॉटेल्स, पब, मल्टिप्लेक्स 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल येथील कमला मिल्स कम्पाऊंड क्षेत्र, अट्रिया मॉल वरळी, आर सिटी मॉल घाटकोपर, फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला, हाय स्ट्रीट फिनिक्स लोअर परेल, गोरेगाव येथे असलेला ओबेरॉय मॉल 24 तास सुरू राहणार आहेत.

Leave a Comment