शेतकरी कर्जमुक्ती योजनेची लिंक उघडल्यावर सुरू होतो कँडीक्रश गेम


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वकांक्षी योजना असलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कँडीक्रश गेम ही लिंक उघडल्यानंतर त्यावर सुरू होत आहे. शेतकऱ्यांना किसान पोर्टलवरून पाठवलेल्या मेसेजमध्ये ही लिंक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये या सर्व प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

किसान पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, पावसाचा अंदाज, शासकीय योजना, पिकांवरील रोग, पिकांवरील रोगांवर उपाय, तापमान इत्याहीबाबत माहिती देण्यात येते. शेतकऱ्यांना या पोर्टलवरून कर्जमाफीसंदर्भात एसएमएस पाठवण्यात आला होता. पण, या लिंकवर आता क्लिक केल्यास प्रसिद्ध कँडीक्रश गेम सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. 27 डिसेंबर रोजी याबाबत राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी केला होता. या कर्जमाफी योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेऊन त्याचं पुनर्गठन केलं आहे आणि ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित आहे, अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे.

Leave a Comment