क्षारपड जमिनीत तांदळाचे उत्पादन


चीनच्या शास्त्रज्ञांनी तांदळाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी कोेंडी फोडणारे संशोधन केले असून क्षारपड जमिनीत चांगले उत्पादन देणारी तांदळाची नवी जात विकसित केली आहे. ही जमीन टकावू समजली जाते. तिच्यात कसलेच पीक येत नाही. पण याही जमिनीत तांदळाचे उत्पादन करता येते हे चिनी शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. चीन हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. त्याचे क्षेत्रफळ मोठे असले तरीही या क्षेत्रफळातले फार कमी क्षेत्र शेती करण्याच्या योग्यतेचे आहे. पठार, वाळवंट आणि समुद्र किनार्‍यारची क्षारपट टाकावू जमीन वगळता फार कमी क्षेत्र शेतीला उरते. परिणामी काही वेळा धान्याची टंचाई जाणवते.

सगळया जगाचे मार्केट काबीज केलेल्या चीनला दोन वर्षांपूर्वी भारताकडून ४० लाख टन तांदूळ आयात करावा लागला होता. भविष्यातही आपल्याला पुरेसे धान्य आपल्या देशातल्या शेतीत पिकेल की नाही याची भीती चीनला वाटत असते. पण आता मोठ्या प्रमाणावर टाकावू ठरलेल्या जमिनीतही तांदळाचे पीक घेता येणार असल्याने चीनची चिंता कमी होणार आहे. चीनमध्ये क्षारपड क्षेत्राचे क्षेत्रफळ दहा लाख चौरस किलो मीटर एवढे आहे. आता या क्षेत्रात तांदळाचे उत्पादन होणार असल्याने चीनचे तांदळाचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणार आहे. या नव्या जातीला युआन मी असे नाव देण्यात आले आहे. त्याच्यामुळे चीनच्या तांदळाच्या उत्पादनात पाच कोटी टन वाढ होईल जिच्यावर चीनमधील २० कोटी लोकांचे पोट भरेल.

तांदळाच्या या नव्या जातीचे पीक घेताना या पिकाला समुद्राचे पाणीही देण्यात आले होते. पण ते थेट देता आले नाही. त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करावी लागली. समुद्राचे पाणी शेतीला वापरण्याचा प्रयोग इस्रायलमध्ये झाला आहे पण तो प्रयोग करताना त्या पाण्यावर बरीच प्रक्रिया करावी लागली आहे. चीनमधील या नव्या तांदळाच्या जातीची शेती करण्यासाठी तेवढी प्रक्रिया करावी लागलेली नाही. या तांदळाचे प्रति हेक्टर उत्पादन किमान ६५ क्विंटल ते कमाल ९३ क्विंटल इतके असल्याचे आढळले आहे. शास्त्रज्ञांनी प्रयोग सुरू करण्यापूर्वी दर हेक्टरी ४५ क्विंटल उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता पण प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक उत्पादन झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा तांदूळ चवीलाही चांगला आहे. असे सारे समाधान असले तरीही हा तांदूळ जरा महाग आहे. पण तरीही काही लोकांनी तो हौसेने खरेदीही केला आहे.

Leave a Comment