पाठदुखीसाठी टेनिस बॉलच्या सहाय्याने व्यायाम


प्रत्येक व्यक्तीच्या उठण्या – बसण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. यातील पुष्कळ सवयी आपल्या दैनंदिन कामामुळे जडलेल्या असतात असे म्हणायला हरकत नाही. या सवयींमुळे क्वचित प्रसंगी पाठदुखी, मानदुखी सारखे आजार उद्भवितात. कधी वेडेवाकडे झोपण्याच्या सवयीमुळे, तर कधी सतत एकाच जागी बसून राहून तासंतास काम करण्याच्या सवयींमुळे पाठदुखी किंवा मानदुखी सारख्या व्याधी पाठीमागे लागतात. या प्रकारची दुखणी निवाराण्याकरिता टेनिस बॉलच्या सहय्याने काही सोप्या व्यायामपद्धती अवलंबता येतील.

जर मान सतत दुखत असेल, तर त्याकरिता मानेच्या स्नायूंना आराम देणे गरजेचे असते. या करिता जमिनीवर एखादी सतरंजी अंथरून पाठीवर उताणे झोपावे. पाय जमिनीवर पूर्णपणे टेकलेले असावेत. मानेच्या मागे एक टेनिस बॉल ठेऊन मानेच्याच सहाय्याने बॉल खालीवर असा सावकाश हलवावा. या हालचालीमध्ये मानेला कुठल्याही प्रकारचा झटका देऊ नये. बॉल मानेच्या सहाय्याने वर ढकलल्यावर मानेवर ताण जाणवतो. हा ताण काही सेकंद कायम राहू द्यावा आणि मग बॉल परत खाली आणावा. बॉल पहिल्याप्रमाणे मानेच्या खाली आल्यानंतर पाच सेकंद विश्रांती घ्यावी आणि हा व्यायामप्रकार पुन्हा एकदा करावा.

पाठदुखीचा त्रास बहुतेकवेळी चुकीच्या स्थितीमध्ये बसल्याने किंवा उभे राहण्याने अथवा अवघडून झोपल्याने सुरु होतो. पाठदुखीच्या त्रासापासून आराम मिळविण्याकरिता जमिनीवर सतरंजी अंथरून पाठीवर झोपावे. दोन टेनिस बॉल, पाठीचा जो भाग दुखत असेल तिथे पाठीच्या मणक्यांच्या कडांना ठेवावेत. बॉल पाठीच्या मणक्यांच्या खाली ठेऊ नयेत अन्यथा मणक्यांना इजा होण्याची शक्यता असते. याच स्थितीत काही वेळ पडून रहावे. पाठीच्या दुखऱ्या भागावर दाब मिळाल्याने आराम मिळतो.

जर काही कारणाने खांदा दुखत असेल, तर जमिनीवर उताणे झोपावे. खांद्याच्या मागील बाजूचे स्नायू आणि पाठीच्या मणक्याच्या मधल्या भागाखाली टेनिस बॉल ठेवावा. या दाबामुळे खांदेदुखी मध्ये आराम मिळेल. खूप चालल्याने किंवा सतत पुष्कळ वेळ उभे राहिल्याने कधी तरी पावले दुखू लागतात. अश्या वेळी टाच आणि पायाची बोटे यामधील खोलगट भागामध्ये टेनिस बॉल ठेऊन पाऊल पुढे मागे फिरवावे. साधारण एक मिनिटभर एका पावलाने हा व्यायामप्रकार केल्यानंतर बॉल दुसऱ्या पावालाखाली ठेऊन हाच व्यायामप्रकार पुन्हा एकदा करावा. या व्यायामाने पावलांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment