‘ ई ‘ जीवनसत्व सुंदर त्वचेसाठी वरदान


केसांचे सौंदर्य आणि त्वचेचे तेज वाढविणाऱ्या पोषक द्रव्यांमध्ये ‘ ई ‘ जीवनसत्व हा सर्वात महत्वाचा घटक आहे. या मध्ये त्वचेला आर्द्रता प्रदान करणारे गुण असून, त्वचा सदैव तरुण आणि सुंदर दिसण्याकरिता आवश्यक पोषक घटक आहेत. ‘ ई ‘ जीवनसत्वाच्या कॅप्सूल्स मधील जेल नियमित चेहऱ्यावर लावल्यास किंवा केसांना लावल्यास त्वचा आणि केस दोन्हीही सुंदर बनतात.

मानसिक ताण, अपुरी झोप किंवा वाढते वय या पैकी कोणत्याही कारणांनी चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. त्वचा कोरडी पडत असली तरी सुरकुत्या येऊ लागतात. अश्या वेळी ‘ई’ जीवनसत्वाच्या कॅप्सूल मधील जेल नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होऊन कालांतराने नाहीशा होतात. रसायनयुक्त मेकअप वापरल्याने त्वचेमधील पेशींचे नुकसान होते. हे नुकसान ही ‘ ई ‘ जीवनसत्वामुळे भरून निघण्यास मदत होते. तसेच ‘ई’ जीवनसत्व त्वचेला आर्द्रता देऊन त्वचेचा कोरडेपणा दूर करते.

‘ई ‘ जीवनसत्वाच्या वापराने त्वचेवर काही कारणाने आलेले व्रण किंवा ओरखडे लवकर भरून निघण्यास मदत होते. चेहऱ्यावरील व्रण किंवा डाग नाहीसे होण्याकरिता ‘ ई’ जीवनसत्वाची कॅप्सूल अर्धी कापून त्यातील जेल व्रणावर लावावे. हा उपाय दररोज करावा. काही दिवसांनंतर डाग हलके झालेले दिसून येतील. ‘ई ‘ जीवनसत्वामुळे त्वचेतील कोलाजेनमध्ये वाढ होऊन व्रण लवकर नाहीसे होतील.

काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशनमुळे काळे डाग येतात. काहींच्या बाबतीत हे पिग्मेंटेशन फारच जास्त असते. ‘ मेलानिन ‘ हा घटक त्वचेला रंग देणारा आहे. हा घटक जेव्हा मोठ्या प्रमाणात त्वचेखाली एकाच ठिकाणी गोळा होतो, तेव्हा काळसर डाग आल्याप्रमाणे त्वचा दिसू लागते. अश्या वेळी ‘ ई ‘ जीवनसत्वातील जेल चेहऱ्यावर लावावा आणि त्याच्या जोडीने ‘ई’ जीवनसत्वाच्या कॅप्सुल्स् चे सेवन ही करावे. त्यामुळे हायपर पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होईल.

काही व्यक्तींचे हात, कितीही मॉईश्चरायझर लावले तरीही सतत कोरडेच पडत राहतात. तसेच थंडीच्या दिवसात ओठ ही फाटतात, टाचांना भेगा पडतात. या सगळ्यांवर उत्तम उपाय म्हणजे ‘ ई ‘ जीवनसत्व. कॅप्सुल मधील जेल काढून घेऊन हातांना, ओठांना किंवा टाचांना लावल्यास कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. तसेच सतत उन्हामध्ये वावरल्याने त्वचेला झालेले नुकसानही ‘ई’ जीवनसत्वाच्या वापरामुळे दूर होते.

‘ई’ जीवनसत्व त्वचेप्रमाणेच केसांच्या सौंदर्याकरिताही फायदेशीर आहे. प्रदूषणाचे, तीव्र उन्हाचे दुष्परिणाम आपल्या त्वचेप्रमाणेच केसांवरही होत असतात. त्यामुळे केस रुक्ष होणे, डोक्यात सतत खाज सुटणे, कोंडा होणे आणि केसगळती ह्या तक्रारी वारंवार सतावू लागतात. ह्या तक्रारी दूर करण्याकरिता ‘ई’ जीवनसत्वाच्या कॅप्सुल्मधील जेल खोबरेल तेलामध्ये मिसळून हे तेल केसांना मुळापासून टोकापर्यंत लावावे. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. या मुळे केसांना आवश्यक पोषण मिळून केसांचा कोरडेपणा किंवा केसगळतीही कमी होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment